काशिनाथ वाघमारे, सोलापूर : मुंबईपर्यंतचा प्रवास जलद व्हावा, या उद्देशाने सोलापूरकरांसाठी ‘वंदे भारत’ ही एक्स्प्रेस रेल्वे सुरू झाली. सुरुवातीला कमी प्रतिसाद लाभला. आता ही सेवा अनुभवता सोलापूरकरांचा प्रतिसाद वाढला असून, प्रवासी संख्या पाच महिन्यांत ८६.४१ टक्क्यांवर पोहोचली आहे. जुलै महिन्यात २८ दिवसांत या रेल्वेने ४५,२४१ सोलापूरकरांनी प्रवास केला असून, ४८ फेऱ्यांच्या माध्यमातून ३ कोटी ५१ लाख ५३,६४५ रुपयांचे उत्पन्न गाठले आहे.
सोलापूर रेल्वेस्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईदरम्यान ११ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठ्या दिमाखात वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली. सुरुवातीच्या दोन महिन्यांत गाडीतील प्रवाशांची संख्या घटली. तेव्हा ५६.३ टक्केच उत्पन्न मिळाले होते. जुलै महिन्यात सोलापूर-सीएसटीदरम्यान २४ फेऱ्या आणि सीएसटी-सोलापूर २४ फेऱ्या मारत प्रवासी वाढल्याची नोंद केली.फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला आता सोलापूरकरांचा प्रतिसाद वाढला असून पाच महिन्यांत ही टक्केवारी ३० टक्क्यांनी वाढली आहे. ती शंभर टक्क्यांवर आणण्यासाठी सोलापूर विभागकडून प्रयत्न होताेय. - एल. के. रणयेवले वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर