सोलापूर : महाराष्टÑ शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ५८ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस १५ नोव्हेंबरपासून येथील हुतात्मा स्मृती मंदिरात प्रारंभ होत असून, यंदा या स्पर्धेत १८ नाटकांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये शहरातील ११ संस्थांच्या नाटकांसह जिल्ह्यातील ४ आणि लातूरमधील ३ नाटकांचा यामध्ये समावेश आहे.
अनिल बर्वेलिखित ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’ या नाटकाने स्पर्धेचा प्रारंभ होत असून, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या महानगर शाखेतर्फे या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी लातूरच्या नाट्य परिषद महानगर शाखेतर्फे ‘पाषणाखालीच’ हे शैलेश गोजमगुंडेलिखित नाटक सादर होणार आहे. १७ नोव्हेंबर रोजी आनंद खरबसलिखित ‘जारव्यांच्या जंगलातून’ हे नाटक अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने सादर होणार आहे.
लातूर जिल्ह्यातील कार्ला येथील बालगंधर्व कला मंचच्या वतीने शमय जाधवलिखित ‘ए नार गाव बेजार’ या नाटकाचा प्रयोग १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. रत्नाकर जाधवलिखित ‘एस दॅटस् माय आॅर्डर’ हे नाटक १९ नोव्हेंबर रोजी येथील बनशंकरी संस्था सादर करणार आहे. प्रसाद वनारसे यांचे ‘गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग २० नोव्हेंबरला गॅलक्सी कल्चरल ट्रस्टच्या वतीने होणार आहे. २१ नोव्हेंबर रोजी वैराग येथील इंडियन आर्ट अॅकॅडमी अमोल साळवे यांचे ‘खटारा’ हे नाटक सादर करणार आहे. २२ नोव्हेंबर रोजी कुर्डूवाडी युवक बिरादरीच्या वतीने डॉ. दिनेश कदम यांच्या ‘बस इतकंच’ या नाटकाचा प्रयोग होईल.
निरंजन मार्कंडेयवार यांच्या ‘काळ्या मुलीचं मॅरेज’ या नाटकाचा प्रयोग २६ नोव्हेंबर रोजी समर्पित फाउंडेशनच्या वतीने होणार आहे. संकल्प युथ फाउंडेशन ही संस्था मुकुंद हिंगणे यांचे ‘यदा यदा ही’ या नाटकाचा प्रयोग २७ नोव्हेंबरला करणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी ‘मुलगा कुठला...’ या नाटकाचा प्रयोग औसा तालुक्यातील कार्ला येथील प्रेरक फाउंडेशनच्या वतीने होणार आहे. रॉय किणीकर यांचे ‘खजिन्याची विहीर’ हे नाटक शोध संस्थेच्या वतीने २९ नोव्हेंबर रोजी सादर होणार आहे. विद्या काळे यांच्या ‘कव्हर स्टोरी’ या नाटकाचा प्रयोग ३० नोव्हेंबर रोजी श्रुती मंदिरच्या वतीने होईल.
अशोक आष्टीकरलिखित ‘चांदणवेल’ या नाटकाचा प्रयोग १ डिसेंबर रोजी सुस्नेह सांस्कृतिक मंडळाच्या वतीने होणार असून, २ डिसेंबर रोजी माढा तालुक्यातील मानेगाव येथील स्वप्निल सपना लोककला विकास मंडळाच्या वतीने पराग घोनगे यांच्या ‘मानसी शिल्पकार’ या नाटकाचा प्रयोग होईल. ३ डिसेंबर रोजी दत्ता भगत यांचे ‘वाटा पळवाटा’ हे नाटक वासुदेव हातमाग विणकर संस्थेच्या वतीने सादर होणार आहे. ४ डिसेंबरला यंग चॅलेंजर्सच्या वतीने आनंद खरबसलिखित ‘दैवम् अंचिन्त्यम’ हे नाटक होणार आहे; तर झंकार सांस्कृतिक मंचच्या नागेंद्र माणेकरीलिखित ‘कंस कथा’ या नाटकाने ५ डिसेंबर रोजी स्पर्धेचा समारोप होणार आहे.
दोन नाटकांची ‘अंतिम’साठी निवड- हुतात्मा स्मृती मंदिराचे नूतनीकरण झाल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून सोलापुरात सलगपगणे राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन होत आहे. गेल्या वर्षी १५ नाटके सादर झाल्यामुळे दोन नाटके अंतिम स्पर्धेसाठी गेली. पूर्वी केवळ एकाच नाटकाची अंतिमसाठी निवड व्हायची; पण आता दोन नाटकांची निवड होत असल्यामुळे स्पर्धेतील सहभागी नाटकांची संख्या वाढली आहे, असे या स्पर्धेच्या समन्वयिका प्रा. ममता बोल्ली यांनी सांगितले.