संचारबंदीच्या काळात नागरिकांनी जवळच्या दुकानातून पायी जाऊन जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे अपेक्षित आहे. मात्र लोक खरेदीसाठी दुचाकी, चारचाकीचा सर्रासपणे वापर करीत आहेत. अनेकांनी तर मास्कचाही वापर टाळल्यामुळे प्रशासनाच्या कडक कारवाईचा इशारादेखील फोल ठरला आहे.
कोरोनाची साखळी तुटावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ३० एप्रिलपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. मात्र, सांगोला शहरात संचारबंदीचे आदेश धाब्यावर बसवून सर्वकाही ऑलबेल असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांवर नागरिकांचा सर्वत्र मुक्तसंचार सुरू असून लॉकडाऊनचे तीन-तेरा वाजले आहेत.
अपुऱ्या बळामुळे पोलीसही हैराण
ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात नसल्याने नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. भाजी मंडईत भाजीपाला खरेदीसाठी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. संचारबंदीत नागरिकांच्या वावरावर बंदी असताना नागरिक, तरुण वर्ग कशाचीही तमा न बाळगता पायी, दुचाकीवर बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. मात्र अपुऱ्या बळामुळे पोलीसही बंदोबस्त लावताना हैराण झाले आहेत.
दुसऱ्या लाटेत कारवाईवर दुर्लक्ष
गतवर्षी लाॅकडाऊनच्या काळात पोलीस स्टेशन, महसूल विभाग व नगरपरिषद यांच्याकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रशासनाकडून नागरिकांवर तशाप्रकारे कारवाई होताना दिसत नाही. मात्र संचारबंदी असली तरी सर्वत्र अवैध धंदे जोमात सुरू आहेत.