नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील विजापूर-मुंबई महामार्गावरील मध्यवर्ती बसस्थानक म्हणून सांगोला बस स्थानक ओळखले जाते. या बस स्थानकावरून दररोज महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी मोठी असते. मात्र कोरोनाच्या साथीमुळे गेल्या वर्षीपासून सांगोला आगारातील एसटीची सेवा पुरती कोलमडली आहे. तर सांगोला बसस्थानकावर प्रवाशांची गर्दीही कमी झाली आहे. त्याचा फटका एसटीच्या उत्पन्नाबरोबरच बसस्थानकाच्या परिसरात विविध छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांनाही बसला आहे.
आज ना उद्या आपल्यातून कोरोना जाईल आणि पूर्वीप्रमाणे सर्वकाही सुरळीत होईल, अशी आशा बाळगून एसटीचे अधिकारी, कर्मचारी व व्यवसाय करणारे होते. परंतु कोरोनाची दुसरी लाट सुरू होताच सगळ्यांच्याच आशेवर पाणी फिरले आहे. दरम्यान, त्याचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजल्यापासून ते ३० एप्रिलच्या ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केल्यामुळे सांगोला आगारातील सुमारे ५१ बस जागेवर थांबून राहिल्या आहेत. त्यामुळे नेहमी प्रवाशांच्या वर्दळीने गजबजलेल्या सांगोला बसस्थानकावर सध्या शुकशुकाट आहे.
चालक-वाहकांची आठवड्यातून एकवेळ हजेरी
वाहतूक नियंत्रक, आगार प्रमुख व कार्यालयीन कर्मचाऱ्यांशिवाय साधा एक प्रवासीही इकडे फिरकत नाही. तर २५० चालक वाहकांसह कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, ड्युटी नसली तरी चालक-वाहकांना आठवड्यातून एकवेळ वाहतूक नियंत्रकाकडे येऊन हजेरी द्यायची आहे. तर २४ चालक-वाहक अत्यावश्यक सेवेसाठी बेस्टच्या वाहतुकीसाठी पाठविल्याचे आगारप्रमुख पांडुरंग शिकारे यांनी सांगितले.
शासनाच्या मदतीवर वेतनाची मदार
संचारबंदीपूर्वी सांगोला आगारातून एसटीच्या दैनंदिन फेऱ्यातून डिझेलपुरते २ लाख ८० हजार ते ३ लाख रुपये उत्पन्न मिळत होते. आता एसटीची चाके थांबल्यामुळे तेही बुडाले आहे. आता एसटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनाची मदार शासनाकडून मिळणाऱ्या मदतीवरच अवलंबून आहे.
फोटो ओळ ::::::::::::::::::::::
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील नेहमी प्रवासी गर्दीने गजबलेल्या सांगोला बसस्थानकावर संचार बंदीमुळे शुकशुकाट असल्याचे छायाचित्र.