सोलापूर : कोरोनाच्या नव्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात सोमवारपासून दररोज सायंकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा, भाजीपाला, डेअरी, बेकरीची दुकाने, कृषी उपक्रम दररोज सायंकाळी चारवाजेपर्यंत सुरू राहतील. इतर सर्व दुकाने केवळ सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत चालू राहतील, असे आदेश आयुक्त पी. शिवशंकर यांनी रविवारी दिले. या निर्बंधांमधून मेडिकल, वैद्यकीय सेवांना वगळण्यात आले आहे.
कोरोनाच्या डेल्टा या नव्या विषाणूचा जिल्ह्यात शिरकाव होईल, असा आरोग्य यंत्रणेचा अंदाज आहे. राज्य शासनाने राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार मनपा आयुक्तांनी रविवारी आदेश जारी केले. शहरातील सर्व दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरात जमावबंदी लागू असेल. सायंकाळी पाच वाजल्यानंतर अत्यावश्यक कारणांशिवाय नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. पाच वाजल्यानंतर संचारबंदी लागू होईल. सर्व खासगी कार्यालयांतील कामकाज ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू ठेवण्यात यावे. वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्यात यावे. विवाह सोहळ्यासाठी ५० जणांना तर अंत्यसंस्कारासाठी केवळ २० जणांना परवानगी असेल, असेही आयुक्तांनी सांगितले आहे.
पेट्रोल पंपही चार वाजेपर्यंत सुरू राहणार
सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे; परंतु प्रवासी उभे न करता सेवा एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सेवा देता येईल. दुचाकी व रिक्षाला शासन नियमानुसार परवानगी असेल. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये जास्तीत जास्त तीन व्यक्तींना परवानगी असेल. शहरातील पेट्रोल पंप सायंकाळी चार वाजेपर्यंतच सुरू राहतील, असे मनपा उपायुक्त एन.के. पाटील यांनी सांगितले.