सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासन संचारबंदी लागू करणार अशी सध्या सर्व नागरिकांत चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन यावर निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, संचारबंदीच्या अफवांमुळे बाजारपेठेत सोलापूरकरांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे पहावयास मिळत आहे. गेल्या आठवड्यात पालकमंत्री भरणे सोलापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर व जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
या प्रस्तावाला शहरातील काही राजकीय मंडळी व व्यापाऱ्यांनी विरोध केला, त्यामुळे पालकमंत्री भरणे यांनी हा निर्णय तूर्त लांबणीवर टाकला. पण आता पुन्हा संसर्गाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे संचारबंदीची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे शहर व जिल्ह्याचे कारभारी क्वारंनटाईन झाले आहेत. त्यामुळे पालकमंत्री भरणे आज काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.