सांगोला तालुका डाळिंब, सिमला मिरचीबरोबरच विविध व्यवसाय, व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, कोलकत्ता, राजस्थान, आंध्र प्रदेश आदी परराज्यातून मोठ्या संख्येने कामगार रोजी-रोटीसाठी सांगोल्यात आहेत. यामध्ये अनेक जण कुटुंबासह वास्तव्य करीत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्या अनुषंगाने सरकारकडून सुरुवातीला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून कडक निर्बंध घालून शनिवार व रविवार सर्व व्यवहार बंद केले होते. अशातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने सरकारने लाॅकडाऊनऐवजी संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील आस्थापना वगळता सर्व व्यवसाय, व्यापार, उद्योगधंदे बंद आहेत.
डाळिंबाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या बागेत जाणे तसेच स्वीट मार्ट, सॅनिटायझर व्यवसाय, हार्डवेअर, कापड व्यवसाय, पाणीपुरी, भेळ, वडापाव आदी व्यवसायासाठी बाहेर पडणारे परप्रांतीय मजूर घरातच बसून राहिले आहेत. आज ना उद्या संचारबंदी शिथिल होईल, मग त्यासाठी गावाकडे परतण्याची गरज नाही. पुन्हा आपण आपल्या व्यवसायात सक्रिय होऊ, अशी आशा बाळगून आहेत. त्यामुळेच की काय हे परप्रांतीय मजूर गावाकडे परतण्याचे नाव घेता घेईनात, असे चित्र पाहावयास मिळत आहे.
परप्रांतीय मजुरांची नोंदच नाही
सांगोला शहर व तालुक्यात नेमके किती परप्रांतीय मजूर कामगार वास्तव्यास आहेत, याचा आकडा ना नगरपालिकेकडे, ना तहसील कार्यालयाकडे उपलब्ध आहे. याबाबत प्रशासनाकडे चौकशी केली असता गतवर्षी १५ हजार ८०० मजूर कामगार आपापल्या गावी पाठवले होते. अनेक जण आपल्या सोयीनुसार गावाकडे परतले होते. यंदा मात्र आमच्याकडे तशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे नायब तहसीलदार किशोर बडवे व मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.