भैरवनाथ शुगर वर्क्स, विहाळ या कारखान्याचा यंदाच्या वर्षीचा गाळप हंगाम यशस्वीपणे चालूृ आहे. आजअखेर १,८५००० मे. टन उसाचे गाळप झाले आहे. कारखान्याचे संस्थापक आमदार तानाजी सावंत यांनी ६ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ऊस उत्पादक सभासद, वाहतूक ठेकेदार, मजूर व सर्व कामगार यांच्या विश्वासार्हतेने पूर्ण करणार असल्याचा विश्वास प्रा. सावंत यांनी व्यक्त केला.
यंदा गाळपास आलेल्या उसासाठी पहिला हप्ता म्हणून प्रति टन दोन हजारप्रमाणे रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. गत वर्षीच्या गाळप हंगामामध्ये कारखान्याची एफ.आर.पी. रुपये १ हजार ९५५.८० प्रति टन इतकी रक्कम असताना दुष्काळी परिस्थितीमुळे कारखान्याच्या ऊस उत्पादक, सभासदांना ५५६ प्रति टनाने उसाचा दर जादा देऊन एकूण प्रतिटन रुपये दोन हजार ५११ प्रमाणे ऊसबिल अदा केले आहे. त्याबरोबरच ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार व मुकादम यांचे तोडणी वाहतुकीचे गत हंगामातील सर्व बिलं अदा करून वचनपूर्ती केली असून, यावर्षी गाळपास येणाऱ्या उसास जिल्ह्यातील अन्य कारखाने जो दर देतील तेवढाच ऊस दर आमचा कारखाना देईल याची ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत, धनंजय सावंत, कार्यकारी संचालक किरण सावंत, ॲड. विक्रम सावंत, पृथ्वीराज सावंत, एक्झुकेटिव्ह डायरेक्टर अविनाश वाडेकर तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख,उपखातेप्रमुख,कर्मचारी,वाहतूक ठेकेदार व ऊस उत्पादक उपस्थित होते.
-----