संताजी शिंदे
सोलापूर : शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान उपक्रमांतर्गत गेल्या २५ दिवसात ६७५ मुलांना ताब्यात घेऊन पुन्हा त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यामध्ये बाप दारू पिऊन मारायचा म्हणून शिक्षण सोडले अन् काम करून घर चालवले, अशी कबुली एका मुलाने दिली.
मुस्कान योजनेंतर्गत पकडण्यात आलेल्यांमध्ये मुलींचाही समावेश आहे. गरिबी, वाईट संगत, प्रेमप्रकरण आदी कारणास्तव मुले घरातून निघून जातात. मिळेल ते काम करतात. एक १४ वर्षांखालील मुलगा अंडा आम्लेटच्या गाडीवर काम करताना आढळून आला. लहान मुलाला कामावर ठेवल्याप्रकरणी मालकावर बालकामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमन १९८६ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. अशा मुलांचा आणखी शोध सुरू आहे.
घरासाठी शाळा सोडलीआई चार घरची धुणीभांडी करते. वडील रात्री घरी दारू पिऊन येतो आणि आईला मारहाण करतो. आम्ही रडू लागलो की, आम्हालाही मारत होता. घरात खर्च करण्यासाठी पैसे देत नाही, शिवाय आईलाच दारूसाठी पैसे मागतो. वडील दररोज दारू पिऊन मारत असल्याने कंटाळून ७वीतून शाळा सोडली अन् हॉटेलमध्ये कामाला जात आहे. मिळालेल्या पगारावर घर चालवतो शिवाय आणखी दोन लहान बहिणी व एक भाऊ आहे अशी व्यथा एका मुलाने मांडली.
शिक्षण आवडत नाहीआई-वडिलांनी शाळेत घातले होते, मात्र तेथे मन रमत नाही. शिवाय शाळा शिकू वाटत नसल्याने मुलगा वर्गात बसत नव्हता. शिक्षक आई-वडिलांकडे तक्रार करू लागले. आई-वडिलांनी मारहाण केल्याने कंटाळून मुलगा घरातून निघून गेला. चायनीजच्या गाडीवर काम करू लागला. आई वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्याचा शोध घेतला आणि पुन्हा पालकांच्या स्वाधीन केले. असा प्रकारही आढळून आला आहे.
प्रेमामुळे घर सोडलेवय वर्ष अवघे १७. बालवयातच एका मुलाबरोबर प्रेम जडले. घरच्या लोकांच्या भीतीने दोघांनीही घरातून पळ काढला. आई-वडिलांनी पोलिसात तक्रार केली. त्यामुळे दोघेही घरी येण्यास तयार नाहीत. गेलेली मुलगी अद्याप आली नाही म्हणून शेवटी आई-वडिलांनी नाद सोडून दिला. २०२० मध्ये एकूण १३ मुली घरातून निघून गेल्या आहेत. त्यापैकी १० मुलींचा शोध लागला आहे तर अन्य ३ मुली या अद्याप आई-वडिलांच्या घरी आल्या नाहीत.
हरवलेल्या मुलांच्या तक्रारी वेगळ्या आहेत. तर मुस्कान योजनेत पकडण्यात आलेली मुले वेगळी आहेत. शहरातील सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व्हे करून बालकामगार मुलांचा शोध घेतला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत आणखी १५० च्या आसपास मुले सापडतील . - बजरंग साळुंखे, पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष.