सोलापूर : पारंपरिक पद्धतीने शेती करताना ओढाताण होणारे कुटुंबीय… ते आज रेशीम शेतीच्या आधारावर मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण पूर्ण… माळशिरस तालुक्यातील गणपत मदने यांच्या जीवनाला रेशीमशेतीने खऱ्या आणि चांगल्या अर्थाने कलाटणी दिली आहे. माळशिरस तालुक्यातील साळमुखवाडी हे गणपत महादेव मदने यांचे गाव. त्यांची ७ एकर शेती आहे. त्यातील ३ एकर क्षेत्रावर रेशीम शेती ते करतात. या शेतीने त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडला. वर्षाला सहा लाखांचा नफा मिळविणार्या मदने यांच्या मुलींची लग्नं अन् मुलाचे शिक्षणही पूर्ण झाले.
गणपत मदने पूर्वी पारंपरिक पद्धतीने ऊस, मका, ज्वारी ही पिके घेत. पण खर्च वजा जाता हातात काही मिळत नव्हतं. विशेष म्हणजे ऊस पिकासाठी येणारा खर्च, मिळणारे उत्पन्न आणि लागणारा कालावधी यांचा ताळमेळ बसत नसल्याने त्यांची खूप ओढाताण व्हायची. त्यांनी दूध व्यवसायही करून पाहिला. त्यांना ४ मुली व एक मुलगा. घरखर्च भागत नसल्याने घरची मंडळी शेजारी रोजंदारीने कामावर जात होती. स्पर्धेच्या युगात मुलांच्या शिक्षणाची व भविष्याची चिंता त्यांना सतावत असे. अशा परिस्थितीत शेजारच्या सुरवसे भाऊसाहेबांनी केलेल्या रेशीमशेतीने मदने यांच्याही मनात आशेची पालवी फुटली. त्यांनी २०१७ साली तुती लागवड करून रेशीम व्यवसायाचा श्रीगणेशा केला. पहिल्या वर्षी नफा कमी झाला. पण, मिळालेला अनुभव, शास्त्रोक्त मार्गदर्शन व त्रृटींची पूर्तता करत दुसऱ्या वर्षीपासून मदने यांनी प्रगतीकडे वाटचाल सुरू केली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लागवड केल्याने घरच्या शेतात काम करून प्रत्येक आठवड्याला मजुरी, साहित्य खरेदीसाठी अनुदान आणि रेशीम संगोपन गृह यासाठी मला जवळपास पावणेतीन लाख रूपये मिळाले. रामनगरला कोष विक्री केल्याने दरपण चांगला मिळाला. प्रत्येक चिकातून एकरी ५० ते ६० हजार रूपये मिळत होते. - गणपत मदने, शेतकरी, साळमुखवाडी
रेशीम विक्रीसाठी जातात कर्नाटकात..
गणपत मदने यांचे दर तीन महिन्याला दोन लॉट विक्रीसाठी जातात. हे कोष सातारा जिल्हा, आत्मा, सोलापूर आणि रामनगर (कर्नाटक) येथे विक्रीसाठी जातात. काही कंपन्या शेतावरही येऊन प्रत्यक्ष खरेदी करतात. जूनमध्ये दोन एकर क्षेत्रावर रेशीम शेती वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याउलट चार ते पाच शेतमजूर त्यांच्या शेतात राबत आहेत. या सुखाच्या दिवसाला एकमेव कारण फक्त रेशीम शेती आहे, असे गणपत मदने अभिमानाने सांगतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"