सोलापूर: विधिवत पूर्जाअर्चा हा आता ब्राह्मणांचा एकाधिकार राहणार नाही. या परंपरेला छेद देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धर्मजागरण समिती सरसावली असून दलित, मागास आणि भटक्या समाजातील युवकांना पौरोहित्य आले पाहिजे, ही भूमिका घेऊन समितीने येथील या समाजातील २६ युवकांना आज पूजा प्रशिक्षण वर्गासाठी नाशिकला पाठविले आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील वेदशास्त्रसंपन्न गुरुजी हिंदू धर्मशास्त्रातील १६ संस्कारांपैकी चार संस्कारांचे प्रशिक्षण या ब्राह्मणेतर युवकांना देणार आहे.पौरोहित्य शिकण्यासाठी उत्सुक असलेले २६ युवक सकाळी हुतात्मा एक्स्प्रेसने दौंडमार्गे नाशिककडे रवाना झाले. हे युवक वडार, मातंग, मेहतर, चर्मकार, टकारी भामटा, कुंचीकुरवे, लमाण, जोशी, कैकाडी, मसण जोगी, रंगारी, स्वकुळ साळी, पद्मशाली, राजपूत, मोची या दलित, भटक्या आणि काही उच्च जातीतील आहेत. या युवकांना आशीर्वाद देण्यासाठी ह. भ. प. लक्ष्मणमहाराज चव्हाण रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. यावेळी महाराज म्हणाले, केवळ ब्राह्मण समाजातील युवकांचाच आजवर पौरोहित्य करण्याकडे कल आणि परंपरा होती. या परंपरेला छेद देऊन कोणत्याही समाजातील व्यक्ती पौरोहित्य करू शकतो, हा पायंडा पाडणे आवश्यक आहे. त्या दिशेने धर्मजागरण समितीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह रंगनाथ बंकापुरे, धर्मजागरण समितीचे प्रांत सदस्य अॅड. राम देशपांडे, समितीचे शहराध्यक्ष आकाश शिरते, जिल्हाप्रमुख नारायण चनमल, सकलेश नावकर, चंद्रकांत गडेकर उपस्थित होते.यासंदर्भात माहिती देताना शिरते यांनी सांगितले की, नाशिक येथील गंगापूर रोडवरील व्यंकटेश मंदिरात २१ ते ३० जूनदरम्यान पूजा प्रशिक्षण वर्ग आयोजित केला आहे. त्यामध्ये या युवकांना प्रशिक्षण देण्यात येईल. या विद्यार्थ्यांचा निवास आणि भोजनाचा खर्च नाशिकच्या बालाजी मंदिर संस्थान करणार असून, प्रवासाचा खर्च धर्मजागरण समितीने उचलला आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये मानवावर १६ संस्कार केले जातात. त्यापैकी जन्म, मृत्यू, विवाह आणि अन्य पूजा आदींचे संस्कार या युवकांवर करण्यात येणार आहेत. प्रशिक्षणाचा वर्ग पूर्ण झाल्यानंतर या युवकांना शंकराचार्य न्यासातर्फे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. -----------------------निवड प्रक्रिया अशी...पूजा प्रशिक्षण वर्गासाठी धर्मजागरण समितीने दलित, मागास, भटके आणि ब्राह्मणेतर अन्य समाजातील युवकांशी संपर्क साधला. त्यांना हिंदू धर्मशास्त्राचे महत्त्व पटवून सांगितले आणि या प्रशिक्षण वर्गाची माहिती दिली. हे प्रशिक्षण घेण्याविषयी विचारणा केली. सोलापुरातील २८ युवकांनी हे प्रशिक्षण घेण्याची इच्छा प्रकट केली. ----------------------------‘ते’ परीक्षकही झालेपंढरपुरातील विठ्ठल मंदिरात पुजारी नेमण्यासाठी मागील सप्ताहात मुलाखती झाल्या. त्या प्रक्रियेत धर्मजागरण समितीच्या पूजा प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षण घेतलेल्या श्रीनिवास पल्लेलू आणि माणिक जंगम या युवकांनी परीक्षक म्हणून काम पाहिले, अशी माहिती समितीचे शहराध्यक्ष आकाश शिरते यांनी दिली.
दलितांची पोरं करणार पौरोहित्य!
By admin | Published: June 21, 2014 1:06 AM