भीमानगर : पुणे येथील सिंचन भवनात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी भीमानगर येथे उजनी धरणाच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभाकर भैया देशमुख यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. गुरुवारी आंदोलनाचा तिसरा दिवस होता.
उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी ५ टीएमसी पाणी योजना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतीच मंजूर करून घेतली. या योजनेला सोलापूर जिल्ह्यातून विरोध होत आहे. १० मे रोजी पुणे येथील सिंचन भवनात उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांना बैठकीसाठी बोलवले होते; परंतु बैठकीचा मूळ उद्देश बाजूला ठेवून सोलापूर जिल्ह्यातील संघटनेच्या सदस्यांना रीतसर बोलावले व तसे पत्र सुध्दा असताना पुणे येथे येण्यास केलेला मज्जाव तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बोलवून वाद निर्माण केला. कोणत्याही निर्णयाविना ही बैठक निष्फळ ठरली.
म्हणून सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाचे पाच टीएमसी पाणी बेकायदेशीररीत्या देण्याचे जे कटकारस्थान रचल्याचा अरोप जनहित संघटनेने केला आहे. पाच टीएमसी पाणी इंदापूरला दिल्यास आष्टी शिरापूर सीना माढा, अक्कलकोट, कुरनूर,बार्शी,करमाळा येथील दहिगाव उपसा सिंचन व इतर उपसा सिंचन योजना बंद पडतील. पोखरापूर सिंचन योजना मंगळवेढ्यातील ३५ गावे सिंचन योजना यांनाही पाण्याची गरज आहे. त्यामुळे एक थेंबही पाणी इंदापूरला जाऊ देणार नसल्याचे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.
या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी पाठिंबा दिला. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, माळशिरस तालुकाध्यक्ष किरण भांगे, संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुका उपाध्यक्ष सचिन पराडे- पाटील, विठ्ठल मस्के, दत्ता गोरे, रामदास खराडे, दादा गायकवाड, अमित वाघ, अतुल भालेराव, मंगेश वाघ, धवल पाटील, दत्ता आरकिले, सौरभ आरकिले, आकाश आवताडे उपस्थित होते.
--
१३ प्रभाकर देशमुख
जनहित शेतकरी संघटना आणि संभाजी ब्रिगेडच्यावतीने उजनीच्या प्रवेशद्वारावर आंदोजन करताना प्रभाकर देशमुख, सचिन जगताप आणि कार्यकर्ते