सोलापूर: धरण अनेकदा घर्षणामुळे फुटते. दगडावर पाण्याची लाट आदळत राहिली तर त्याचेही नुकसान होते. तसेच कुठेही जास्त अॅक्टिव्हिटी झाली तर ते होऊ शकते. खेकड्यांनी अॅक्टिव्हिटी केल्यामुळे हे घडले असावे, असे गावकऱ्यांना वाटलं होतं. इतर धरणाच्या ठिकाणी अशाप्रकारची अडचण झाली आहे का, यावर संशोधन सुरू आहे. पण धरण कुणामुळे फुटले यापेक्षा आता इतर धरणे आहेत त्याचे मजबुतीकरण कसे करू शकतो हे पाहिले पाहिजे. ती धरणे सुरक्षित आहेत का हे तपासले पाहिजे. एकतर धरणे कमी पडत आहेत. ती वाढविली पाहिजेत, असे मत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयात बुधवारी सकाळी आदित्य ठाकरे यांचा ‘आदित्य संवाद’ हा कार्यक्रम झाला. अनोख्या अंदाजात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ठाकरेंनी विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोलापुरातील मुलांना नोकरीसाठी पुणे-मुंबईलाच जावे लागते. तुम्ही यासाठी काही कराल का? गावाकडे बस येत नाही, खेळासाठी मैदान नाही यावर तुम्ही काही तोडगा काढाल का?, असे अनेक मुलभूत प्रश्न विद्यार्थ्यांनी ठाकरे यांच्यासमोर उपस्थित केले. नवे उद्योग यावेत यासाठी एक वर्षाच्या आत काम करुन दाखवेन. इतर प्रश्न १५ दिवसाच्या आत मार्गी लावेन, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. या कार्यक्रमाला जलसंधारणमंत्री तानाजी सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर, आदी उपस्थित होते.