सोलापूर : सांगोला व पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातील पाणीपातळी घटू लागली आहे. पंढरपूरच्या बंधाऱ्यात फक्त पावणेदोन मीटर पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे शहराला पुढील काही दिवसांनंतर दोन दिवसांआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. सांगोला व पंढरपूर शहरासह ८० गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातदेखील पाणीसाठा होता. या बंधाऱ्याची पाणी साठवण्याची क्षमता तीन मीटर आहे; परंतु पुरेसा पाऊस न झाल्यामुळे व उजनी धरणातील पाणीपातळी कमी झाली आहे.
सध्या बंधाऱ्यामध्ये दीड मीटर (१.८० मी.) पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा रोज पाणीपुरवठा केल्यास फक्त २० मेपर्यंत पुरेल एवढा आहे. त्यामुळे सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. जादा दिवस पाणी पुरवण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. सोलापूर महानगरपालिकेने शहराला पिण्यासाठी पाणी सोडावे, असे निवेदन भीमा पाटबंधारे विभागाला दिले आहे. उजनीतून पाणी सोडण्याची प्रक्रिया होईपर्यंत पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. जादा दिवस पिण्याच्या पाणीपुरवठा व्हावा, यासाठी काही दिवसांनी दोन दिवसांआड पाणी सोडण्यात येणार आहे. उजनी धरणातून पुन्हा पाणी न सोडल्याने बंधाऱ्यातील पाणीपातळी पूर्ण कमी होणार आहे. पंढरपूर व सांगोल्यावर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावे लागणार आहे. पाणी जपून वापरा...सध्या पंढरपुरातील बंधाऱ्यातील पाणीपातळी कमी झाली आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे, असे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, पाणीपुरवठा अभियंता काळे यांनी केले आहे.