उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोटनिवडणूक प्रचारासाठी दोन दिवसांच्या पंढरपूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी येथील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री दत्ता भरणे, आ. संजय शिंदे, दीपक साळुंखे, कल्याणराव काळे, संभाजी शिंदे, बळीराम साठे, उमेश पाटील, सुरेश घुले, भगीरथ भालके, साईनाथ अभंगराव, उत्तम जानकर आदी प्रमुख उपस्थित होते.
आम्हा तीन पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारमुळे भाजपची पोटदुखी वाढत आहे. केवळ सरकारला बदनाम करण्यासाठी रोज नवनवे आरोप करून लोकांची दिशाभूल केली जात आहे. सध्या राज्यात काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत. हे लक्षात येताच, अशा अधिकाऱ्यांना तातडीने बाजूला करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे, असे अजित पवार म्हणाले. दरम्यान, मागे आपल्याकडून काही चुका झाल्या, चुकीच्या मार्गाने गेलो. मात्र, त्या चुका करूनही खा. शरद पवार व अजित पवार यांनी कायम आम्हाला बोलावून मदत केली. त्यामुळे पुन्हा त्या चुका होणार नाहीत, असे कल्याणराव काळे यांनी भाषणात सांगितले.
या सोहळ्यात राज्य सरकारने घालून दिलेले कोरोनाचे नियम पायदळी तुडवत कार्यकर्ते, एकत्र बसले होते. यावेळी अनेकांनी मास्कचा वापर केला नसल्याचेही निदर्शनास आले.
———
कोणत्याही चौकशीस तयारी..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वाझेप्रकरणी झालेले आरोप फेटाळून लावत याप्रकरणी माझी कोणतीही चौकशी करावी त्यास माझी तयारी आहे, असे खुले आव्हान विरोधकांना दिले. आढीव येथील फार्महाऊसवर पत्रकारांशी ते बाेलत होते..
——
चुकीचे काम केल्याने विरोध : शिंदे
- यावेळी आ. संजय शिंदे म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोहिते पाटलावर विश्वास दाखवत जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली. मात्र, त्यांनी सहकारी संस्थांमध्ये चुकीची कामे केल्याने आपण त्यांना विरोध केला.
----
फोटो- ०८पंढरपूर०२
- कल्याणराव काळे यांचे राष्ट्रवादीमध्ये स्वागत करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, दत्ता भरणे, संजय शिंदे, दीपक साळुंखे, सुरेश घुले आदी.
————