माढा: माढा तालुक्यातील केवड येथील सुनील संदिपानधर्मे यांच्या शेतात अचानक आलेल्या जोराच्या वावटळीमुळे ३० टन द्राक्ष मालाचे व बागेचे फाउंडेशन तुटून २७ लाखांचे नुकसान झाले.
केवड येथील सुनील संदिपान धर्मे यांनी आपल्या शेतात गेल्या तीन वर्षांपूर्वी बँक कर्ज घेऊन द्राक्षबागेची लागवड केली होती. मंगळवारी झालेल्या वावटळीने अडीच एकर द्राक्षबाग जमीनदोस्त होऊन मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती संबंधित शेतकºयाने दिली. केवड या गावी जाऊन शासकीय अधिकाºयांनी घटनास्थळाची पाहणी केली व झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला.कर्ज काढून मोठ्या अपेक्षेने द्राक्ष बागेचे संगोपन केले होते.
त्यामधून येणाºया उत्पन्नावर कर्ज फेडता येईल, या आशेने आम्ही सर्व कुटुंबीय होतो, परंतु या आलेल्या वावटळीमुळे बाग जमीनदोस्त होऊन नुकसान झाले. त्यामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या खूपच अडचणीत येऊन आणखी कर्ज वाढणार असल्याची प्रतिक्रिया सुनील धर्मे यांनी दिली. बागेच्या फाउंडेशनचे सात लाख व द्राक्ष पिकाचे वीस लाख असे सत्तावीस लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
केवड येथील द्राक्ष बागेच्या झालेल्या नुकसानीबाबत पंचनामा करुन माढा कृषी कार्यालयाकडे फाईल सादर केली आहे.- राजेश चव्हाण, तहसीलदार
केवड येथील वावटळीने झालेल्या द्राक्ष बागेच्या नुकसानीचा पंचनामा केलेली फाईल आली आहे. या शेतकºयाच्या झालेल्या नुकसानीच्या फाईलचा पाठपुरवठा करीत आहोत.- दत्ता येळे, माढा कृषी अधिकारी