सोलापूर : अतिवृष्टीमुळे पुणे विभागात सुमारे दीड लाख हेक्टरवरील आधिक पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
डॉ. म्हैसेकर यांनी आज पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे श्रीनाथ पांडुरंग नामदे यांच्या द्राक्ष बागेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख, रामदास ढोणे, तालुका कृषी अधिकारी आर. वाय. पवार , तहसीलदार वैशाली वाघमारे आदी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले की, पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील नुकसानीचा अंदाज घेतला असता सुमारे दीड लाख हेक्टर खालील पिकांचे नुकसान झाले आहे. येत्या काही दिवसांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसानीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुणे विभागात सांगली जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ सोलापूर जिल्ह्यात नुकसान झाले आहे. सर्व जिल्हाधिकारी यांना पंचनामे करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत.
तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी संयुक्तपणे पंचनामे करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. पंचनामे येत्या तीन ते चार दिवसांत केले जातील. पंचनामे बाबत प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. शेतकºयांनी या हेल्पलाईन वर संपर्क साधावा, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.