मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे
मंगळवेढा तालुक्यातील दामाजी सहकारी साखर कारखान्यांची प्रारूप मतदार यादी बुधवार २० एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध झाली. प्रादेशिक सहसंचालक कार्यालय, सोलापूर व कारखाना कार्यस्थळावर ही यादी एकाच वेळी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती पुणे साखर संघाचे सोलापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी राजेंद्रकुमार दराडे यांनी लोकमत' शी बोलताना दिली. या यादीत २८ हजार १५७ मतदारांचा समावेश आहे.
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मंगळवेढा तालुक्यातील दामाजी सहकारी साखर कारखान्याची कच्ची मतदार यादी जाहीर झाल्याने निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. पात्र-अपात्रतेचा विषय अनेक महिने रेंगाळत आल्याने या यादीमध्ये आपला समावेश आहे का हे पाहण्यासाठी सभासद कारखाना कार्यस्थळावर धाव घेत आहेत. सभासदांच्या कच्च्या यादीवर दि २० ते २९ एप्रिल २०२२ दरम्यान या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप व हरकत दाखल करता येणार आहे. तेथून हरकती व आक्षेप यांच्यावर निर्णय २ मे ते ११ मे पर्यत घेतला जाणार असून १७ मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. प्रारूप मतदार यादी दामाजी कारखाना कार्यस्थळावर तसेच प्रादेशिक सहसंचालक (साखर ) सोलापूर या कार्यालयात पाहण्यासाठी तसेच विकत हवी असेल तर ती घेण्यासाठी उपलब्ध आहे अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक पांडुरंग साठे यांनी दिली.