सोलापूर : शाळा महाविद्यालयातील तरुणी, महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाड सारखे प्रकार रोखण्यासाठी दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचारी रस्त्यावरून गायब झाल्याने छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. रोडरोमिओ पाठलाग करत असल्यामुळे महिला व मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सात पोलीस ठाणे आहेत. फौजदार चावडी पोलीस ठाणे, जेल रोड पोलीस ठाणे, सदर बाजार पोलीस ठाणे, विजापूर नाका पोलीस ठाणे, सलगर वस्ती पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे यांचा समावेश आहे. शहरात अनेक ठिकाणी शाळा कॉलेजेस आहेत. शिवाय बहुतांश महिला नोकरी व कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडतात. जाता-येता बऱ्याच ठिकाणी चौकाचौकात रस्त्याच्या कडेला रोडरोमिओ थांबलेले असतात. पायी चालत जाणाऱ्या येणाऱ्या महिला मुलींची छेड काढणे त्यांचा पाठलाग करणे. अशा अपप्रवृत्तींना आळा बसावा यासाठी दामिनी पथक आत १३ महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
या महिला मोटारसायकलवरून शहरातील प्रत्येक रस्त्यावरून सकाळी, सायंकाळी, रात्री गस्त घालत होत्या. एखाद्या महिलेने किंवा मुलीने नियंत्रण कक्षाला संपर्क साधल्यास दामिनी पथकाच्या महिला पोलीस तत्काळ घटनास्थळावर धाव घेत होत्या. शिवाय फिरणाऱ्या दामिनी पथकाला पाहूनही अनेक रोडरोमिओ छेडछाड सारखे प्रकार करण्याचे धाडस करत नव्हते. त्यामुळे महिला मुलींना एक प्रकारचे संरक्षण होते, आता पथक रस्त्यावर दिसत नसल्याने पुन्हा रोडरोमिओ पुन्हा छेडछाडीचे प्रकार करताना दिसून येत आहेत.
नवीपेठ सारख्या ठिकाणी गस्तीची गरज
शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीपेठेतील अनेक दुकानांत महिला, मुली कामाला आहेत. शिवाय बहुतांशी महिला वर्ग खरेदीसाठी येत असतो. याच परिसरात काही रोडरोमिओ त्यांचा पाठलाग करणे छेड काढणे असे प्रकार करत असतात. नवीपेठसह शहरातील अन्य बाजारपेठांमध्ये व सार्वजनिक रस्त्यांवर महिलांकरिता ९ ते ९.३० वाजेपर्यंत गस्त वाढविण्याची गरज असल्याचे सर्वसामान्य लोकांमधून बोलले जात आहे.
दामिनी पथकाने केलेल्या कारवाया
- २०१९- ९०
- २०२०- ५८
- २०२१- ३५
महिला कर्मचारी कमी झाल्यामुळे रस्त्यावर दामिनी पथकाची गस्त कमी झाली आहे. मात्र आवश्यकतेनुसार पोलीस व्हॅन मधून गस्त घातली जाते. महिला मुलींनी न घाबरता तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. रोडरोमिओंचा बंदोबस्त केला जाईल.
- डॉ. दीपाली धाटे, पोलीस उपायुक्त.