सांगोला तालुका हा मागील अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत होता. आ. शहाजीबापू पाटील विजयी झाल्यानंतर इतिहासामध्ये प्रथमच गेल्यावर्षी टेंभू योजनेचे पाणी उन्हाळी आवर्तनातून सांगोला तालुक्याला मिळाले. माण नदीवरील सर्व बंधारे भरून यशस्वीरीत्या गतवर्षीचे आवर्तन पूर्ण झाले. याहीवर्षी माण नदीमध्ये टेंभू योजनेचे पाणी सोडावे, असे लेखी पत्र देऊन आ. शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांकडून माण नदीत पाणी सोडण्याचे आदेश होते.
शेजारील गावांनाही फायदा होणार
टेंभू योजनेतून उन्हाळी आवर्तनाचे आटपाडी तलावातून ३५० क्युसेकने सोडलेल्या पाण्यातून माण नदीवरील बलवडी, वझरे, नाझरे, चिणके, अनकढाळ, वाटंबरे, कमलापूर, वासूद, अकोला, कडलास, वाढेगाव, बामणी, सावे, मांजरी, देवळे, मेथवडे बंधारे भरल्यानंतर नजीकच्या गावांसह शेजारील अन्य गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. नीरा उजवा कालव्याचेही आवर्तन यशस्वीरीत्या चालू असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे आ. शहाजीबापू पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत असल्याने जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे.