करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात उजनी धरणाचे बँकवॉटर असून, शेजारीच इंदापूर तालुका आहे. रस्ता मार्गावरून अंतर जास्त असल्याने व बॅकवॉटरमार्गे कमी वेळेत व कमी अंतर असल्याने पश्चिम भागातील ग्रामस्थ सध्या बॅक वॉटरच्या जलवाहतुकीस प्राधान्य देत आहेत. करमाळा व इंदापूर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या अथांग व विस्तृत उजनी बॅकवॉटर भागात जवळचा मार्ग म्हणून मच्छीमार बोटीद्वरे प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अलीकडे गेल्या तीन वर्षापासून सैराट चित्रपटाचे याच बॅकवॉटर भागात चित्रीकरण झाल्याने पर्यटनासाठी येणाऱ्या शौकिनांची संख्या वाढली आहे.
उजनी बॅकवॉटर भागात मच्छीमार वापरत असलेल्या बोटीचाच पाण्यातून सफर करण्यासाठी वापर केला जातो तो धोकादायक आहे. मच्छीमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटी पूर्वी वल्हे असणाऱ्या होत्या. त्यात थोडासा बदल करून त्यावर छोटे इंजीन बसवण्यात आलेले आहे. मासेमारीसाठी या बोटी उपयुक्त आहेत. ते पोहण्यात तरबेज असतात; पण पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेले शौकिनांना पाण्याची खोली व भौगोलिक परिस्थितीचा अंदाज येत नाही. आनंद लुटण्याच्या नादात सेल्फीच्या मोहात आकाराने छोट्या असलेल्या या नौकाविहारासाठी धोकादायक आहेत. त्या बोटीत लाईफ जॅकेट व सुरक्षिततेच्या कसल्याही सोयी-सुविधा नाहीत.
----
दुर्घटना घडूनही घेतला जात नाही बोध
रविवारी अकलूज येथून उजनी बॅकवॉटर भागात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या शेंडगे कुटुंबातील बाप-लेक सेल्फीच्या नादात धोकादायक मच्छीमार बोट उलटून शिकार ठरले तर इंदापूर तालुक्यातील अजोतीच्या बॅकवॉटरमध्ये मच्छीमार बोटीत बसून आनंद उलटणारे अकलूज व माळशिरस भागातील तीन डॉक्टर बुडून मरण पावले होते. पंधरा वर्षापूर्वी करमाळा तालुक्यातील टाकळी येथून आठवडी बाजारासाठी इंदापूर तालुक्यातील पळसदेवकडे बोटीतून प्रवास करणाऱ्या आठ जणांना जलसमाधी मिळाली होती. अशा छोट्या-मोठ्या दुर्घटना नेहमीच होत आहेत.
----
बॅकवॉटरला पर्यटनाचे सुरक्षित पाॅइंट ठरवा..
उजनी बॅक वॉटर पर्यटनाचे आकर्षण ठरू पाहत आहे. बॅकवॉटर भागात पर्यटनाचे सुरक्षित पॉइंट निश्चित केले जावेत. पश्चिम भागातून इंदापूर भागात जलवाहतुकीसाठी परवानाधारक सर्व सुरक्षिततेच्या दृष्टीने सुसज्ज लॉंच व मोठी बोट प्रवासासाठी ठेवल्या पाहिजेत. याकडे प्रशासनाच्या अपत्ती व्यवस्थापनाने लक्ष द्यावे म्हणजे दुर्घटना टळतील.
- अॅड. दीपक देशमुख, वांगी नं. १
फोटो : उजनी बॅकवॉटर भागात प्रवासासाठी वापरली जाणारी धोकादायक मच्छीमार बोट.
----