यशवंत सादूलसोलापूर : प्रत्येक संकटात आई गं म्हणणारे सर्वजण साप दिसताच बापरे म्हणतात . त्यामुळे भल्याभल्यांची भंबेरी उडते, अशा सापांशी मैत्री करीत परिसरात आढळणाऱ्या या प्राण्यांना निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्याचा आगळावेगळा छंद सौंदर्या कसबे हिने जोपासला आहे. मुरारजी पेठेतील खमितकर अपार्टमेंट येथे राहणारी सौंदर्या ही वसुंधरा महाविद्यालयात बीएच्या अंतिम वर्षात शिकत आहे.
तिला लहानपणापासूनच सापांविषयी उत्सुकता होती. तिचे वडील हे २० वर्षांपासून सर्पमित्र म्हणून काम करत आहेत. त्यामुळे लहानपणापासून सापांची ओळख, त्यांची हाताळणी संदर्भात शिक्षण बाळकडू मिळत गेले. लहान सापांना वडिलांसोबत धरायला ती शिकली. वडील कामावर असताना ती एकटी जाऊन सापांना रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यास तिने सुरुवात केली. रामलाल चौक, यश नगर, मुरारजी पेठ, उज्ज्वल सोसायटी, जुनी मिल कंपाऊंड, खमीतकर अपार्टमेंट, उमा नगरी या परिसरात एखाद्या ठिकाणी साप आढळले की, नागरिकांकडून सौंदर्या हिला फोन येतात. ती त्याठिकाणी जाऊन सापांना पकडते.
कवड्या, धूळ नागिण, तस्कर, धामण आदी बिनविषारी साप तसेच सात विषारी नागांसाह आजपर्यंत तिने चाळीस ते पन्नास साप पकडले. फक्त सापच न पकडता ती जखमी पक्ष्यांवरही उपचार करते. मांज्यामध्ये अडकलेल्या गव्हाणी घुबड, वंचक बगळा, कबुतरे, खारुताई अशा अनेक प्राणी पक्ष्यांवर उपचार करून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. सौंदर्या हिला निसर्गाची आवड असून वन्यजीव त्यासंदर्भातील क्षेत्रात करिअर करणार आहे. कथ्थक नृत्याचीही तिला आवड असून आजतागायत त्यात विशारद होण्याचे तिचे स्वप्न आहे .
साप दिसल्यास घाबरू नका
- सोलापूर शहर, जिल्ह्यात २७ प्रकारचे साप आढळतात त्यापैकी मण्यार, नाग, घोणस, फुरसे हे चारच ते विषारी असून बाकीचे सर्व बिनविषारी आहेत. सापाला न मारता सर्पमित्रांच्या मदतीने त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावे. सापाला मारल्यास वन्यजीव कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते. इतर कुणी सापाला मारत असेल तर त्याला मारण्यापासून परावृत्त करुन निसर्गाचे रक्षण करावे, असे सौंदर्याने सांगितले.
- साप आपला मित्र असून परिसरातील उंदीर, घुशी या सारख्या उपद्रवी प्राणी हे त्यांचे भक्ष्य करत असल्याने आपल्याला उपकारक आहेत. बिनविषारी साप असल्यास त्याच परिसरात राहू द्यावे असे तिचे म्हणणे आहे.