अकलूज-माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगर परिषद व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करावे, या मागणीसाठी तीनही गावांच्या ग्रामस्थांनी अकलूज प्रांताधिकारी कार्यालयासमोर २२ जूनपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दिवसेंदिवस व्याप्ती वाढत आहे. दररोज विविध सामाजिक संघटनांच्या वतीने उपोषणाला पाठिंबा दिला जात आहे.
या साखळी उपोषणाची शासनाने दखल न घेतल्याने आज दहाव्या दिवशी संतप्त युवकांनी आत्मक्लेश करून घेत उपोषणस्थळी हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, हार, फुले, फळे, खाद्य साहित्यासह पिंडदान करून दशक्रिया विधी केला. या सरकारचे करायचं काय, खाली मुंडी वर पाय, कोण म्हणतंय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही, या घोषणा देऊन शासनाचा निषेध केला.
आज उपोषणात उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, भाजप युवा आघाडीचे शहराध्यक्ष दिग्विजय माने-पाटील, माजी सरपंच विठ्ठलराव गायकवाड, दादासाहेब मोरे, ग्रा.पं. सदस्य गणेश वसेकर, माळेवाडीचे राजेंद्र नरुटे, नातेपुतेचे संदीप ठवरे, माजी सदस्य अण्णा कुलकर्णी, सुरेश वाईकर, बाळासाहेब सणस, प्रद्युम्न गांधी, तनवीर तांबोळी, नवनाथ गायकवाड, मुस्लिम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शहाजहान आत्तार, नवशक्ती नवरात्र महोत्सव मंडळाचे पदाधिकारी, सयाजीराजे व्यापारी संघटनेचे सदस्य, बागवान समाजाचे कार्यकर्ते, नवीन बाजारतळ, मार्केट कमिटी येथील नागरिक सहभागी झाले होते.