सोलापूर : या आहेत आयपीएस ऑफिसर. सोलापूरच्या डॅशिंग एसपी तेजस्वी सातपुते. अस्सल मराठी मातीतल्या खानदानी अन् पारंपारिक नऊवारी पेहरावात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांचं नवं रूप सादर करण्याचं ठरलं. त्यांनाही वेगळी कल्पना आवडली.
मग काय.. टीम कामाला लागली. साडी त्यांनीच पसंत केली. मात्र त्याला मॅचिंग ब्लाऊज नव्हता. शोधाशोध करुन तो सोलापुरातल्या एका लेडीज टेलरकडून शिवून घेतला. नाकात नथ, गळ्यात पांढऱ्या मोत्यांची माळ अन् कपाळावर ठसठशीत चंद्रकोर. पायातली चप्पलही कोल्हापुरी.
नेहमी ‘खाकी’त दिसणाऱ्या कडक एसपी उर्फ लेडी सिंघम या रुपात पार बदलून गेल्या. अन् हो.. रणरागिणीच्या हातात तलवारही शोभून दिसली. करारी नजरेनं जणू अधिकच धारदार बनली.
या अनोख्या वेशभुषेला मॅच होणारं परफेक्ट बॅक ग्राऊंड सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात वाट पहात होतं. लोकेशन ठरलं. परवानगीही घेतली. मेकअपसाठी दीड-दोन तास. शूटसाठी दोन तास. कधी ऊन जास्त तर कधी पक्ष्यांचा डिस्टर्बन्स अधिक. अखेर शेवटी हा जबरदस्त लूक मिळालाच.
या शूटबाबतचा अनुभव विचारला असता सातपुते म्हणाल्या, ‘माझ्या लग्नातही असा मेकअप अन् शूट करता आला नव्हता. आयुष्यात पहिल्यांदाच तो या निमित्तानं पूर्ण करता आला.’
या सुंदर मेकअपची संकल्पना सुप्रसिद्ध आर्टिस्ट सोनल अमोल पांचाल यांची. अचूक भावमुद्रा टिपलीय फोटोग्राफर रोहित इंदापुरे यांनी. अर्थात नऊ दिवस.. नऊ सेलिब्रिटी..