सोलापूर : खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाºया कोरोनाग्रस्तांनी आत्तापर्यंत सुमारे ४८ कोटी रुपये खर्च केले आहेत. या खर्चामध्ये बाहेरील औषध दुकानातून खरेदी केलेल्या औषधांच्या बिलांचा समावेश नाही.
सोलापुरात कोरोनाचा पहिला रुग्ण हा १२ एप्रिल रोजी आढळून आला. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्याही वाढतच आहे. सुरुवातीला फक्त शासकीय रुग्णालयातच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. त्यानंतर रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयांना देखील कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली. शहरातील २५ कोविड हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटर अधिग्रहित करण्यात आले. यापैकी २२ रुग्णालय खासगी आहेत. आतापर्यंत सुमारे ४८ कोटी रुपये रुग्णांनी कोविड-१९ च्या उपचारावर खर्च केले आहेत. यात जास्त वाटा हा बेड चार्जेस, औषधे, इंजेक्शन यांचा आहे. यामध्ये कोरोनामुक्त झालेल्या तसेच मृत पावलेल्या रुग्णांच्या खर्चाचाही समावेश आहे.
खासगी रुग्णालयातून उपचार घेणाºया रुग्णांना अधिकची बिले लावण्यात येत असल्याचे आरोप झाले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयाने दिलेल्या बिलाचे लेखापरीक्षण करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. ही समिती सध्या बिलांचे लेखापरीक्षण करुन देयकांची रक्कम कमी करत आहे.---------२६ जुलै ते २२ सप्टेंबरपर्यंत १२ कोटींचा खर्च२६ जुलै ते २२ सप्टेंबर दरम्यान ५९ दिवसात शहरात खासगी रुग्णालयात जवळपास १६८० रुग्णांनी उपचार घेतले आहेत. खासगी रुग्णालयांनी या रुग्णांना १२ कोटी ७० लाख ३६३ रुपयांची बिले दिली होती. लेखा परीक्षकांनी या सर्व बिलांची तपासणी केली. यात सुमारे ८७ लाख ४६ हजार रुपयांची तफावत लेखापरीक्षकांनी निदर्शनास आणून दिली. यामुळे या ५९ दिवसात ११ कोटी ६६ लाख ६६ हजार ४३२ रुपये आकारण्यात आले, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त, कोविड कंट्रोल रुमचे सनियंत्रण अधिकारी धनराज पांडे यांनी दिली.