सोलापूर : कवी अशोक नायगावकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषद आणि प्रिसिजन फाऊंडेशन यांच्यावतीने दिला जाणारा स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये, स्मृती चिन्ह, आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवार २ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात हा पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते नायगावकर यांना प्रदान केला जाईल.
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरणानंतर कवी अशोक नायगावकर यांचा काव्यवाचनाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि प्रिसीजन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुहासिनी शहा यांनी दिली.
यापूर्वी डॉ. स्वर्णलता भिशीकर, डॉ.अनिल अवचट, प्रा. मिलिंद जोशी,अभिनेत्री स्पृहा जोशी, कवी संदीप खरे, क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी, डॉ.अरुणा ढेरे आणि ज्येष्ठ साहित्यिक सुनील शिनखेडे यांना यापूर्वी दत्ता हलसगीकर राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे.