पटवर्धन कुरोली : पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील शेतकरी माजी सरपंच जालिंदर मोरे यांच्या शुभाली मोरे या मुलीला कॅम्पस मुलाखतीतून तब्बल ३५ लाख रूपये वार्षिक पॅकेजच्या नोकरीची आॅफर मिळाली आहे. शुभाली ही आयआयटी बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये मेकॅनिकल एरोनेटिक एमटेकचे शिक्षण घेत आहे. तिला मिळालेल्या या पॅकेजमुळे ग्रामीण भागातील मुलींसमोर आदर्श निर्माण केला आहे.
शुभाली मोरे हिचे प्राथमिक शिक्षण पटवर्धन कुरोलीतील नृसिंहवाडी झेडपी शाळा, माध्यमिक शिक्षण पटवर्धन कुरोली प्रशाला व यशवंत विद्यालय भोसे येथे झाले. पदवीचे शिक्षण पंढरपूर येथील केबीपी कॉलेज तर पदव्युत्तर शिक्षण इस्लामपूर (जि. सांगली) येथील राजारामबापू टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये झाले आहे. त्यानंतर गुणवत्तेवर आयआयटी बॉम्बेमध्ये मेकॅनिकल एरोनेटिक एमटेकसाठी तिची निवड झाली होती. त्यानुसार कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या मुलाखतीमध्ये हेलकॉन कंपनीने तिला तब्बल वार्षिक ३५ लाख रूपये पगाराची आॅफर दिली आहे.
शुभालीचे वडील पूर्वीपासून प्रतिकूल परिस्थितीत शेती करतात. त्यामध्येही त्यांनी मोठ्या जिद्दीने आपली तिन्ही मुले आयआयटीमध्ये शिक्षणासाठी पाठविली आहेत. त्यापैकी शुभाली एक आहे. शुभालीने आई-वडिलांनी दाखविलेल्या विश्वासाच्या जोरावर मोठ्या जिद्दीने मिळविलेले हे यश ग्रामीण भागातील शेतकºयांच्या मुलींना दिशादर्शक ठरणार आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.