सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाचा सतरावा युवा महोत्सव ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला. या महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद दयानंद महाविद्यालयाने सगल दुसऱ्यांदा पटकावले. दुसरा क्रमांक बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालय तर तिसरा क्रमांक पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने पटकावला.
विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या युवा महोत्सवात ४० महाविद्यालयांतील ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकूण १६ कला प्रकारांचे सादरीकरण महोत्सवात करण्यात आले. नृत्य, ललित, गायन आणि वाड्.मय अशा चार विभागांत कलाप्रकार घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी घरी राहूनच दिलेल्या लिंकवर विहित वेळेत आपल्या कला प्रकारांचे सादरीकरण केले. सोनी महाविद्यालय, वसुंधरा कला महाविद्यालय, विद्यापीठ संकुल, संगमेश्वर महाविद्यालय येथे महोत्सवाचे परीक्षण करण्यात आले.
बक्षीस वितरण ऑफलाइन
युवा महोत्सवाच्या विविध कला प्रकाराचा निकाल हा महोत्सवाच्या तिसऱ्या व अंतिम दिवशी जाहीर करण्यात आला. दरवर्षी बक्षिसाचे वितरण हे महोत्सव स्थळी होत असते. मात्र, यंदा ऑनलाइन पद्धतीने महोत्सव घेतल्यामुळे बक्षीस वितरण महोत्सवाच्या अंतिम दिवशी घेण्यात आले नाही. काही दिवसांनंतर बक्षिसांचे वितरण हे ऑफलाइन पद्धतीने मोजक्या मान्यवरांच्या उपस्थित होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
विद्यापीठाने अतिशय चांगल्या पद्धतीने युवा महोत्सवाचे आयोजन केले. अठरा महिन्यांपासून घरात असलेल्या विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव देण्याचा यशस्वी प्रयत्न यातून झाला. आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व संघ व्यवस्थापक यांनी महोत्सवासाठी मेहनत घेतल्याने हे यश मिळाले. भविष्यातही शैक्षणिक विकासासोबतच विविध कलागुणांना वाव देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
- डॉ. विजयकुमार उबाळे, प्राचार्य, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय