काशिनाथ वाघमारे, सोलापूर: पंढरपुरात चंद्रभागा नदीवर नवीन बंधा-याजवळ २२ वर्षीय युवक बुधवारी दुपारी दोन वाजता बुडाला होता. बोटीच्या मदतीने त्याचा शोध घेत असताना आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या हाती २१ तासांनी अर्थात गुरुवारी सकाळी ११ वाजता त्याचा मृतदेह मिळाला. राजसिंह रणजीतसिंह सरदार (वय २२, रा. सांगोला) असे पाण्यात बुडून मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे.
राजसिंह सरदार हा व्यवसायानिमित्त पंढरपूर येथे कुटुंबासह आला होता. लोखंडी वस्तू, वीळा, खुरपी अशा वस्तू बनवून विकण्याचा त्याच्या कुटुंबाचा व्यवसाय आहे. बुधवारी दुपारी दोन वाजता सरदार हा दोघा मित्रांसमवेत चंद्रभागा नदीवर स्नान करण्यासाठी गेला होता. नवीन पुलाच्या वरील बाजूस बंधाऱ्याजवळ सर्वजण स्नान करीत होते. यावेळी राजसिंह बंधा-याजवळच्या पाण्यात वाहून गेला. सध्या उजनी धरणातून भीमा नदीला सहा हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नदीत मोठ्या प्रमाणात वेगाने पाणी वाहत आहे.
या पाण्यात खोलीचा अंदाज न आल्याने राजसिंह वाहून गेला. घटना समजताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. स्पीड बोटीच्या साहाय्याने राजसिंहचा शोध कालपासून सुरू होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"