सोलापूर : शासकीय पोर्टलवरील आणि सेवा सुविधा केंद्रावरील नागरिकांच्या अर्जाचा निपटारा दिलेल्या मुदतीत होण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर 2022 या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असा सेवा पंधरवडा राबविण्यात आला. यामध्ये नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा मोठ्या प्रमाणात झाला आहे, उर्वरित प्रकरणांचा निपटारा ५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत करण्याच्या सूचना अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या.
सौनिक यांनी सेवा पंधरवड्याचा आढावा व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. यावेळी पुण्याहून विभागीय आयुक्त यांच्यासह सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूरहून निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, तहसीलदार अंजली कुलकर्णी, दत्तात्रय मोहाळे उपस्थित होते.
सौनिक यांनी सेवा पंधरवड्याचा विभागनिहाय आढावा घेतला. २३ लाख ७६ हजार ६३२ अर्जापैकी १४ लाख ८६ हजार अर्जावर कार्यवाही झाली आहे. राज्यामध्ये शिधापत्रिका, किसान सन्मान निधी योजनांचे काम त्वरित होण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. पुणे विभागाचे काम तांत्रिक बाबीमुळे प्रलंबित होते, ते काम पुढच्या पंधरवड्यात पूर्ण होईल, असा विश्वास विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला.
सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सर्व विभागाच्या वेळोवेळी बैठका घेऊन सूचना दिल्या होत्या. उर्वरित काम होण्यासाठी संबंधित यंत्रणांना कामाला लावले आहे. १० सप्टेंबर २०२२ पर्यंत आलेल्या अर्जांचा निपटारा केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडील काम ९८.०७ टक्के झाले आहे. शिवाय इतर विभागाचेही काम ९८.९० टक्के झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नागरी सेवा केंद्रामार्फत देण्यात येणारे विविध प्रकारचे दाखले (जातीचा, उत्पन्नाचा, अधिवास, रहिवासी, नॉन क्रिमिलेअर आणि इतर दाखले) ८४ हजार ४०७ अर्ज आले होते, सर्व अर्जावर कार्यवाही पूर्ण झाली आहे. सामाजिक अर्थसहाय्य योजना (संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना) यामध्ये २२८७ अर्जावर १०० टक्के काम पूर्ण झाले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण ९१ टक्के, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा ९७ टक्के, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण 100 टक्के, आपले सरकार व पीजी पोर्टलवरील प्रलंबित तक्रारीचा १०० टक्के निपटारा आणि नगरपालिका शाखांच्या कामांचाही १०० टक्के निपटारा झाल्याची माहिती शंभरकर यांनी दिली.