सोलापूर : सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. सोलापूर- विजयपूर महामार्गाचे काम आता पूर्णत्वाकडे जात आहे. हत्तुर ते केगाव बायपासवरून शहरातील जीवघेणी जड वाहतूक २६ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. नव्या चौपदरी सुपर एक्स्प्रेस महामार्गामुळे सोलापूरहून विजयपूरला एका तासात पोहोचता येणार आहे.
सोलापूर ते विजयपूर हे अंतर शंभर किलोमीटर आहे. पुणे, औरंगाबाद, हैदराबादहून आलेल्या वाहनांना विजयपूरला जाण्यासाठी सोलापूर शहरातून जावे लागत होते. सन २०१२ पासून सोलापूर शहरात जडवाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला होता. शहरात जडवाहतुकीमुळे अनेक जीवघेणे अपघात झाले. यात शाळकरी मुलांचाही बळी गेला. त्यामुळे शहरात दिवसा जड वाहतुकीला पोलीस आयुक्तालयाने बंदी घातली होती. त्यामुळे हैदराबाद, धुळेकडून येणारी जड वाहने दिवसभर मार्केट यार्ड तर विजयपूरकडून येणारी वाहने नवीन विजापूर नाक्याजवळ अडविली जात होती. ही वेळ संपल्यावर जुना विजापूर नाका ते मार्केट यार्ड या मार्गावर जड वाहनांची रांग लागायची. यातून मार्ग काढणे शहरातील वाहनधारकांना जिकिरीचे झाले. मध्यंतरी हा नियम शिथिल करण्यात आला. दुपारी १ ते ३ या वेळेत जड वाहने सोडली जाऊ लागली; पण जड वाहतुकीचा प्रश्न कायम राहिला होता.
विजयपूर मार्गाचे काम वेगाने
सोलापूर ते विजयपूर हा चौपदरी महामार्ग मंजूर झाला. पुढे हा मार्ग चित्रदुर्गपर्यंत जातो. हे काम वेगाने पूर्ण करण्यात आले आहे. विजयपूर ते हत्तुर तेथून बायपासमार्गे पुणे महामार्गाला केगावला हा मार्ग जोडण्यात आला आहे. त्यामुळे विजयपूर मार्गावरून येणारी सर्व जड वाहने हत्तुरमार्गे केगावळला वळविण्यात येणार आहेत. ही वाहतूक सुरू झाल्यावर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.
२६ डिसेंबरला वाहतूक सुरू
हत्तुर ते केगाव बायपास मार्गावरील काही किरकोळ कामे राहिली आहेत. बाळेदरम्यान रेल्वे पूल टाकण्याचे काम सुरू आहे. ही किरकोळ कामे पूर्ण झाल्यावर २६ डिसेंबरपासून नवीन मार्गावरून चोवीस तास जड वाहतूक सुरू होईल. शनिवारी हत्तुरजवळील बायपासच्या पुलाखालून वाहतूक सुरू करण्यात आली. तैरामैलच्या (बसवनगर) पुढे टोल नाका आहे. या नाक्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
एका तासात विजयपूर
बसवनगरचा पूल कार्यान्वित केल्यावर या मार्गावर चाचणी घेण्यात आली. हत्तुर ते विजयपूर हे अंतर चारचाकी वाहनाने एका तासात कापले. वाहनाचा वेग ताशी १२० किलोमीटर होता; पण एक्स्प्रेस हायवेला नियमाने ताशी ८० किलोमीटर वेगाने वाहन चालविण्यास परवानगी आहे.
केगाव ते हत्तूर बायपासचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील काम पूर्ण झाले आहे. बाळे येथील रेल्वे पुलाचे काम सुरू झाल्यावर २६ डिसेंबरपासून नवीन मार्गावरून वाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. हा मार्ग सुरू झाल्यावर शहरातील जडवाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे व विजयपूर महामार्ग चोवीस तास वाहतुकीला खुला राहील.
- संजय कदम, संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण