घोडातांडा : ओडीसामध्ये ‘रायगडा’सीमेवर कर्तव्य बजावत असताना एका जवानाचा मंगळवारी (१० जून २०१४)मृत्यू झाला़ हा जवान सोलापूरमधील देगाव परिसरात बसवेश्वरनगर तांडा येथील असून त्याचा मृतदेह तब्बल ७२ तासानंतर सोलापुरात आला़ शुक्रवारी सकाळी त्याच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले़ दरम्यान, मृत जवानाच्या आईने या संपूर्ण प्रकाराबद्दल संशय व्यक्त करणारी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. चंद्रकांत राम पवार (वय ३२) असे मरण पावलेल्या जवानाचे नाव असून त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे़ २००४ साली तो सीआरपीएफ (बटालियन ०८) मध्ये भरती झाला होता़ पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षानंतर चंद्रकांतने सीआरपीएफमध्ये भरतीसाठी गेला़ या कुटुंबाची परिस्थिती अगदी हलाखीची होती़ ‘ना शेत ना जमीन’ याही अवस्थेत आई-वडिलांनी त्यांना मोठे केले आणि शिक्षण घेतले़ दोन वर्षांपूर्वी वडील राम पवार यांचे निधन झाले़ मंगळवारची सायंकाळ ठरली दु:खद मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता रायगडा सीआरपीएफच्या नियंत्रण कक्षातून चंद्रकांतच्या घरी फोन आला़ यावेळी आई सोनाबाई यांनी फोन उचलला़ ‘आपला मुलगा चंद्रकांत याने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे’ तिकडून कानी पडलेले वाक्य ऐकून सोनाबाई जमिनीवर कोसळल्या़ बसवेश्वर नगर तांड्यातील लोक घरातील लोकांच्या रडण्याने एकत्रित जमा झाले़ विचारपूस करु लागले़ ७२ तासानंतर मृतदेह सोलापुरात रायगडा येथे शवविच्छेदनानंतर चंद्रकांतचा मृतदेह गुरुवारी दुपारी २ वाजता विमानाने भुवनेश्वरहून मुंबईत आणण्यात आला़ मुंबईतील सीआरपीएफच्या पथकाने कॅप्टन आरएएफ प्रधान मर्म यांच्या नेतृत्वाखाली एका वाहनातून पार्थिव शुक्रवारी सकाळी सोलापुरात आणला़ मृत्यूनंतर त्याचा मृतदेह सोलापुरात आणायला एकूण ७२ तास लागले़-----------------------------संशयास्पद मृत्यूबाबत कुटुंबाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार मुलगा चंद्रकांत याचे आईसोबत आदल्यादिवशी सोमवारी रात्री मोबाईलवर बोलणे झाले होते़ सारेकाही व्यवस्थित असल्याचे तो सांगत इकडची खुशाली जाणून घेतली होती़ त्यानंतर काही तासांनी अर्थात मंगळवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून मुलाचा मृत्यू झाल्याचा फोन आला़ सारेकाही व्यवस्थित असताना त्याने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या कशासाठी केली? मंगळवारी मृत्यू झाला असताना मृतदेह आणायला तीन दिवस का लागले? फोनवर सकारात्मक उत्तरे मिळण्याऐवजी तिकडून अधिकाऱ्यांच्या बोलण्यात गोंधळ का जाणवला? असे अनेक प्रश्न चंद्रकांतच्या आईसह कुटुंबापुढे उपस्थित झाले़ यातून कुटुंबात चंद्रकांतच्या घातपाताचा संशय बळावला आणि या कुटुंबाने बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय गाठले़ दरम्यान, जिल्हाधिकारी हे पुण्याला कामानिमित्त गेल्याने ते उपस्थित नव्हते़ या कुटुंबाने निवासी उपजिल्हाधिकारी विजय देशमुख यांची भेट घेतली़ देशमुख यांनी देखील ओडीसा सीआरपीएफशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिकडून काहीच उत्तर मिळत नव्हते़ यामुळे चंद्रकांतच्या कुटुंबाच्या मनातील संशय आणखी घट्ट झाला़ गुरुवारी दुपारी पुन्हा तीन वाजण्याच्या दरम्यान या कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले़ यावेळी जिल्हाधिकारी गेडाम यांची भेट झाली आणि तीन दिवसानंतरही मुलाचा मृतदेह मिळत नसल्याची तक्रार केली़ मुलाच्या मृत्यूमागे निश्चितच घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करीत याची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याची मागणी केली़ जिल्हाधिकाऱ्यांनी प्रबोधन करीत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला़ त्यांच्या पाठपुराव्यानंतर मृतदेह शुक्रवारी सोलापुरात आणण्यात आला़ --------------------------------------शासकीय अंत्यसंस्कार शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात चंद्रकांतचा मृतदेह बसवेश्वर नगर तांड्यावर आणण्यात आला़ सकाळी सव्वादहा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ तत्पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुनील गोडबोले यांनी सलामी दिली़ शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले़ यावेळी सहायक पोलीस आयुक्त दिलीप चौगुले, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे निरीक्षक गायकवाड, सहायक निरीक्षक राजेंद्र उशिरे,मुंबई कल्याण संघाचे कल्याण केरबा आदी उपस्थित होते़ चंद्रकांतचा भाऊ बीएसएफमध्ये चंद्रकांतचा मोठा भाऊ सुरेश हा बीएसएफमध्ये असून तो पंजाब सीमेवर कार्यरत आहे़ मोठ्या भावाची प्रेरणा घेऊन चंद्रकांत हा सीआरपीएफमध्ये दाखल झाला़ लहान भावाच्या मृत्यूने त्याला धक्का बसला़ त्याचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने सुरेशने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत प्रकरणाची चौकशी वरिष्ठ स्तरावर करण्याची मागणी केली़
देगावच्या जवानाचा ओडिसात मृत्यू
By admin | Published: June 14, 2014 1:33 AM