सोलापूर : न केलेल्या गुन्ह्यात गुंतवल्याने आणि कारागृहामध्ये कोणीही भेटण्यासाठी न आल्याने नैराश्येतून कोणीही येत नसल्याने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न करणाºया कैद्याचा मंगळवारी सकाळी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. रावसाहेब उत्तम आवारे (वय ४२, रा. गुरुनानक नगर, उजनी कॉलनी, सोलापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणातील मयत रावसाहेब आवारे याच्यासह अन्य कर्मचारी २१ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास गुरुनानक नगर परिसरातील जलसंपदा विभागात काम करत होते. त्यावेळी त्याने त्याच्या कार्यालयातील अधिकारी सोमनाथ नामदेव हिळे (रा. उजनी वसाहत, सोलापूर) यांच्यावर खुनीहल्ला केला होता.
या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक करुन कारागृहात दाखल केले होते. या घटनेला महिन्याचा कालावधी उलटला तरी त्याला भेटण्यासाठी नातलगासह अन्य कोणी न आल्याने तो निराश झाला होता. मानसिकदृष्ट्या खचलेल्या अवस्थेत रावसाहेब याने ५ मार्च २०१८ रोजी दुपारी आपण मेलो तरी आपल्या जागी मुलीला नोकरी लागेल, जगून तरी काय उपयोग, अशा भावना इतर कैद्यांसमोर व्यक्त केल्याची चर्चा होती. त्यानंतर त्याने कारागृहात हेअर सलूनचे काम करणाºया न्यायालयीन कैद्याची व फिर्यादीची नजर चुकवून ब्लेड चोरले. त्याच ब्लेडने कारागृहातील शौचालयात जाऊन गुप्तांगावर वार करून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर तातडीने कारागृहातून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याला शासकीय रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डात पोलिसांच्या निगराणीखाली ठेवले होते. तिथेही त्याने पोलिसांची नजर चुकवून १४ मार्च २०१८ रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास वॉर्डातील खिडकीला लुंगीच्या साहाय्याने गळफास घेऊन दुसºयांदा आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर त्याला अतिदक्षता विभागात उपचारास दाखल केले होते. दरम्यान, मंगळवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांत झाली आहे.
मयत रावसाहेब यास दोन मुली, पत्नी असा परिवार असल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी सातच्या सुमारास पोस्टमार्टेमनंतर त्यांचे पार्थिव नातलगांकडे सुपूर्द करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांनी सांगितले.