वैराग : पाणी म्हणजे जीवन.. त्यासाठी गावोगावी अनेकांना आटािपटा करावा लागतो. वैरागचीही तीच अवस्था. तीन दिवसाआड पाणीपुरवठा. मग काय पाणीसाठवणुकीसाठी नेहमीचीच धडपड यातूनच वैरागमध्ये पहाटे पाणी येणार म्हणून रद्दीच्या दुकानामध्ये झोपलेल्या व्यापाऱ्याला आग लागल्याने होरपळून मृत्यूला कवटाळावे लागले. ही हृदयद्रावक घटना शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास वैराग येथे घडली. योगेश गुप्ता (४५ रा. वैराग, ता. बार्शी) असे मृत्यू पावलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
वैराग परिसराला अनेक दिवसांपासून तीन दिवसाआड पहाटे पाणीपुरवठा होतो. काहीजण या पाण्यासाठी अर्धी रात्र जागून काढतात. वैराग ग्रामपंचायतीच्या जवळ गुप्ता यांचे तीन मजली दुकान आहे. खालच्या मजल्यात जुनी रद्दी आणि पुस्तकाचे दुकान आहे. ते गावातील पंढरपूर अर्बन बँकेसमोर भाड्याने राहतात. पहाटे पाणी येणार असल्याने ते गुरुवारी रात्री शटर खाली घेऊन रद्दी दुकानात झोपी गेले होते. शनिवारी पहाटे अचानक दुकानास आग लागली. दुकानात नवीन, जुनी अनेक पुस्तके, पेपर रद्दी आणि कागदी साहित्य मोठ्या प्रमाणात ठेवले होते. पहाता-पहाता आग भडकत गेली. या आगीतून त्यांना बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही.
आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. शॉर्ट सर्किट झाले असावे, अशी चर्चा परिसरात होती. याबाबत गुप्ता यांचे बंधू विजयकुमार सीताराम गुप्ता (३२, रा. वैराग) यांनी वैराग पोलिसांत तक्रार दिली आहे. या घटनेने शहरातून हळहळ व्यक्त होत आहे.
जीवाच्या आकांताने ते ओरडत राहिले
पहाटेची वेळ असल्याने सर्वजण साखरझोपेच्या अधीन होते. इकडे आगीच्या ज्वालामुळे योगेश गुप्ता जीवाच्या आकांताने जोर जोरात ओरडत राहिले. मात्र, कोणालाही त्यांचा आवाज पोहचू शकला नाही. आणि त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. आगीच्या ज्वाला आणि ओरडण्याने काही नागरिक जागी झाले. तोपर्यंत आगीने चांगलाच पेट घेतला होता. तशाही स्थतीत काहींनी शटर तोडण्याचा प्रयत्न केला. काहींनी पोलिसांना आणि अग्निशामक दलाच्या जवांनांना पाचारण केले. या जवांनांना दुकानाची भिंत पाडून आत प्रवेश करावा लागला. पण तोपर्यंत खेळ खलास झाला होता. योगेश गुप्ता यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळाला. दरम्यान, अग्निशामक दलाच्या पथकाने आग नियंत्रणात आणली, पण तोपर्यंत होत्याचे नव्हते झाले. प्रथमदर्शनी ही आग आतूनच शॉर्ट सर्किटने लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गॅसचा स्फोट टळला
दुकानामध्ये गॅसने भरलेल्या आणि एक रिकामी टाकी होती. या टाकीला गॅस नळी जोडली होती. टाकीचा व्हाॅल्व चालू होता. आगीत रबरी नळी जळून त्यातून गॅस बाहेर पडला, मात्र स्फोट झाला नाही. यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे पोलिसांनी सांगितले.
अन् काळानं घातला घाला
- रद्दीच्या दुकानात मयत योगेश गुप्ता यांचा भाऊ रात्री झोपत असे. मात्र नेमके ते काही कामानिमित्त पुण्याला गेले होते. म्हणून योगेश पाणी येणार म्हणून येथे झोपले होते. नेमके याच दिवशी ही दर्दैवी घटना घडली. जणू काळ तेथे दबा धरुन बसला होता आणि ही दुर्दैवी घटना घडली.
फोटो : २३ वैराग
आगीच्या भक्षस्थानी पडलेले गुप्ता यांचे रद्दी दुकान