करमाळा : मुलगा विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यानिमित्त गावात कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध पित्यास कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने त्यात ते गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अहमदनगर - टेंभुर्णी महामार्गावर करमाळा तालुक्यातील कंदर येथे शनिवारी (दि. ११) सकाळी १० वाजता घडली आहे.
बाळासाहेब रामा कदम (८१, रा. कंदर, ता. करमाळा) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कंटेनर चालक चिंटू पासवान (रा. समशेरनगर औरंगाबाद, बिहार) याच्या विरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. वयोवृद्ध बाळासाहेब यांचा मुलगा कबीर कदम हे जिल्हा परिषदेच्या अकलूज येथे कार्यरत होते. तेथे ते विस्तार अधिकारी म्हणून ३१ मे रोजी निवृत्त झाले. त्यांचा रविवारी कंदर येथे मूळगावी सेवानिवृत्तीबद्दल कार्यक्रमाचे आयोजन करून सत्कार करण्यात येणार आहे.
गावातील परिचयाच्या व्यक्तींना निमंत्रण देण्यासाठी बाळासाहेब कदम कंदर गावातील अमोल कृषी केंद्रासमोरील साइडपट्टीवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने (क्र. एनएल ०१ आर २४६१) जोरदार धडक दिली. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम होऊन ते रस्त्यावर पडले. यावेळी कंटेनर न थांबता तसाच पुढे जात असताना गावकऱ्यांनी त्याला थांबवले. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.