माढा/ सोलापूर : मानेगाव येथून तुर्कपिंपरी येथे नेऊन ऊस वाहतूक करणाºया प्रदीप उर्फ राजाभाऊ कल्याण कुटे याला दोन हवालदार व इतर दोघांनी संगनमताने मारहाण करून खून केल्याची फिर्याद मुलाची आई सुनीता कल्याण कुटे हिने माढा पोलिसांत दिली आहे. त्यानुसार या दोन्ही पोलिसांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कुटे यांच्या मृतदेहाचे सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात तब्बल सहा तास ‘इन’ कॅमेरा शवविच्छेदन झाले.
याबाबत माढा पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, प्रदीप कल्याण कुटे, सुनीता कल्याण कुटे, प्रदीपची पत्नी सुनंदा कुटे व प्रदीपचा चुलत भाऊ भीमराव माणिक कुटे हे सर्वजण तुर्कपिंपरी येथील बबनरावजी शिंदे शुगर येथे ऊस वाहतुकीचे काम करीत होते. रविवारी नरखेड (ता. मोहोळ) या भागातील ऊस घेऊन कारखान्याकडे जाताना मानेगाव आऊटपोस्टसमोरील रस्त्यावर दुपारी ३.३० वा. हवालदार क्षीरसागर, कुंभार व इतर दोघांनी ट्रॅक्टर अडवून टेप का लावला म्हणून प्रदीपला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जागेवरच मृत्यू झाला. मानेगावातील अभिजित नागनाथ पारडे, चंद्रकांत माने, भीमराव माणिक कुटे यांनी हा घडलेला प्रकार पाहिल्याचे मयताची आई सुनीता कल्याण कुटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर पोलिसांनी त्याला गाडीत घालून ग्रामीण रूग्णालयात दाखले केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. दरम्यान, नातेवाईकांनी मृतदेह माढा पोलीस ठाण्यासमोर ठेवून गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. दुपारी गुन्हा दाखल झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह सोलापूरला हलविण्यात आला.
राजाभाऊ कुटे याचा मृतदेह पहाटे ५.३0 वाजता शासकीय रूग्णालयात आणण्यात आला. माढा येथील न्यायालयाची परवानगी घेऊन दुपारी १.३0 वाजता शवविच्छेदनाला सुरूवात झाली. शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरांची टीम शवागृहात दाखल झाली. शरीराच्या प्रत्येक भागाचे विशेष तज्ज्ञ असलेल्या आठ डॉक्टरांचा या टीममध्ये समावेश होता. डॉक्टरांनी सर्व पोलीस व नातेवाईकांना बाहेर काढून कॅमेºयाच्या निगराणीखाली शवविच्छेदन करण्यास सुरूवात केली. रात्री ७.३0 वाजेपर्यंत शवविच्छेदन सुरूच होते. राजाभाऊ कुटे याच्या मृतदेहासोबत त्याचा मामा गणेश धस व दोन मित्र होते. माढ्याचे पोलीस उपाधीक्षक पाटील, पोलीस निरीक्षक निकम, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
पत्नी, आई - वडिलांचा आक्रोशराजाभाऊ कुटे यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर सोनागिरी येथे त्यांची पत्नी आणि आई - वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. रविवारी दुपारी दीड वाजता कुटे कुटुंबामध्ये सुरू असलेला आक्रोश तब्बल तीस तास सुरू होता.