वैराग : येथील विद्यामंदिर कन्या प्रशालेतील मुख्याध्यापकांचा पगारपत्रकावरील सह्यांचा अधिकार रद्द केल्यामुळे २६ शिक्षकांचे पगार गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहेत. त्यामुळे त्रस्त शिक्षकांनी प्रशालेसमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
संस्थेतील एका कर्मचाऱ्याने शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांचा पगारपत्रकावरील सह्यांचा अधिकार रद्द ठरवला आहे. त्यामुळे येथील २६ कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्यात आले आहे. दरम्यान, शिक्षकांचे पगार थांबल्यामुळे त्यांचे गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, सोसायटीचे हप्ते, मुलांचा शैक्षणिक खर्च आणि फी यासह इतर खर्च खोळंबले आहेत. त्यामुळे शिक्षकांचा मानसिक ताण वाढत चालला आहे. लवकरात लवकर पगार मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
---
कर्मचाऱ्याची पत्नी देतेय मृत्यूशी झुंज
येथील कर्मचारी जक्कांना यशवंत कोळी यांच्या पत्नी मीनाक्षी कोळी या मे महिन्यापासून अश्विनी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांना आत्तापर्यंत २२ लाख रुपये खर्च करावा लागला असून, पगाराव्यतिरिक्त इतर उत्पन्नाचे साधन त्यांच्याकडे नाही. त्यात सध्या पगार बंद असल्याने त्यांच्या समोरील अडचणीत वाढ झालेली आहे. त्यामुळे पगारासाठी वैरागमधील विद्यामंदिर कन्या प्रशालेच्या कर्मचाऱ्यांनी येथील इमारतीसमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
---