सोलापूर : गेल्या महिन्याभरापासून शहरात ऊन आणि ढगाळ वातावरण असून यामुळे साथीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यू या जीवघेण्या आजाराचा धोकाही वाढलेला आहे. आज येथील खासगी रूग्णालयात स्वाईन फ्ल्यूने एका महिलेचा मृत्यू झाला; तर वैद्यकीय शिक्षण घेणारी तिची मुलगी डेंग्यूने आजारी आहे. याशिवाय स्वाईन फ्ल्यू आणि डेग्यूग्रस्त दोन रूग्णांवर शहरात उपचार सुरू आहेत.
हमीदा रियाजभाई शेख (वय ४३, रा़ रौनक अपार्टमेंट, दक्षिण सदर बझार, सोलापूर) असे स्वाईन फ्लूने मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे़ मयत हमीदांची मुलगी अलिया (वय २३) ही मात्र डेंग्यूशी लढते आहे़ या दोन्ही आजाराला खासगी रुग्णालयाच्या आरोग्य अधिकाºयांनी दुजोरा दिला आहे.
शहरातील खासगी रुग्णालयात विविध आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे़ यामध्ये लवकर कमी न होणाºया तापाचे रुग्ण सर्वाधिक दिसून येत आहेत़ यामध्ये हमीदा यांनाही दाखल करण्यात आले़ वेल्डिंग व्यवसाय करणारे पती रियाजभार्इंनी तत्काळ हालचाली केल्या़ याच दिवशी मुलगी अलिया हिला देखील उलटी, ताप आणि पोटदुखी सुरू झाली़ तिलाही याच रुग्णालयात दाखल करण्यात आले़ तिची सारी लक्षणे ही डेंग्यूकडे नेणारी ठरली़ ती सध्या आजारातून सुधारण्याच्या स्थितीत आहे.
१३ वर्षीय कृष्णाचा तापाने मृत्यू याच वॉर्डामध्ये (वॉर्ड क्र. १६) लष्कर परिसरातील चंडक हॉस्पिटलमागील कृष्णा रमेश भागानगरे या १३ वर्षीय मुलाचा तापाने मृत्यू झाला़ तो अपंग होता़ रविवारी सकाळी ताप आल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले़ येथील डॉक्टरांनी दिलेल्या औषधांवर तो घरी उपचार घेत होता़ सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ताप वाढत गेला आणि त्याला झटके आले़ यातच त्याचा मृत्यू झाला़