सोलापूर : जिल्ह्यातील ४० पैकी २८ साखर कारखान्याचे गाळप सुरू असून, १५ डिसेंबरपर्यंत गाळप झालेल्या उसाचे ३५४ कोटी रुपये कारखानदारांकडे थकले आहेत. १५ साखर कारखान्यांनी २२८ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ५९ लाख ७२ हजार २३१ मेट्रिक टन ऊस गाळपातून ५० लाख ९५ हजार क्विंटल साखर तयार झाली आहे. सरासरी साखर उतारा ७.८३ टक्के इतका पडला आहे. १५ डिसेंबरपर्यंत झालेल्या गाळपाचे एफआरपीनुसार ५८२ कोटी रुपये साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना देणे बंधनकारक होते. मात्र सुरू असलेल्या २८ पैकी १५ साखर कारखान्यांनी २२८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आली. एफआरपीनुसार ३५४ कोटी रुपये कारखानदारांनी थकवले आहेत. १५ डिसेंबरनंतरही काही साखर कारखान्यांनी ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे मात्र त्याची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
पांडुरंगने पहिली उचल दिली
श्री पांडुरंग कारखान्याने सर्वाधिक प्रतिटन २१०० रुपये पहिली उचल दिली आहे. विठ्ठलराव शिंदे, मकाई सहकारी, सासवड माळी शुगर, विठ्ठल कार्पोरेशन, भैरवनाथ विहाळ, भैरवनाथ लवंगी, बबनराव शिंदे केवड, विठ्ठल रिफायनरी पांडे, विठ्ठलराव शिंदे करकंब व भीमा टाकळी सिकंदर या साखर कारखान्यांनी प्रतिटनाला दोन हजार रुपयाप्रमाणे पैसे दिले आहेत. युटोपियन कारखान्याने १७०० रुपये, तर सिद्धनाथ कारखान्याने अनामत म्हणून काही रक्कम दिली असल्याचे सांगण्यात आले.
उताऱ्यात पांडुरंगची आघाडी
साखर उताऱ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही पांडुरंग कारखाना आघाडीवर आहे. पांडुरंग साखर उतारा ९.७८ टक्के इतका आहे. त्यानंतर सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखाना ९.७५ टक्के, विठ्ठलराव शिंदे करकंब ९.५५ टक्के, बबनराव शिंदे ९.५१ टक्के, मातोश्री लक्ष्मी शुगर ९.२६ टक्के, सिद्धेश्वर कारखाना ९.१७ टक्के, लोकनेते बाबूराव अण्णा पाटील ९.१६ टक्के, जयहिंद शुगर ९.०७ टक्के, भैरवनाथ लवंगी ९.०३ टक्के इतका साखर उतारा पडला आहे. २८ पैकी ९ साखर कारखान्यांचा साखर उतारा ९ टक्क्यांपेक्षा अधिक तर सर्वात कमी ५.०८ टक्के साखर उतारा जकराया साखर कारखान्याचा आहे.
जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने संपूर्ण एफआरपीनुसार रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. पहिली उचल दिली असून, एफआरपीनुसार उर्वरित रक्कम देणे बंधनकारक आहे.
- पांडुरंग साठे
उपसंचालक, प्रादेशिक सहसंचालक (साखर)