करमाळा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रभारी सचिव पदासाठी राजेंद्र पाटणे यांच्या नेमणुकीचा ठराव सभापती शिवाजी बंडगर यांच्या विशेष मताअधिकारान्वये मंगळवारी मंजूर झाला.
जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या निरीक्षणाखाली व सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांच्या उपस्थितीत पणन संचालकांच्या सूचनेनुसार संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली.
पाटणे यांच्या नावाचा ठराव मंजूर झाला असला तरी माझे अपील पणन संचालकाकडे असल्यामुळे मी माझ्याकडील पदभार पाटणे यांना देणार नाही असे प्रभारी सचिव विठ्ठल क्षीरसागर यांनी सांगितले.
३१ मे २०२१ रोजी प्रभारी सचिव नेमणुकीबाबत बैठक झाली असताना सेवाजेष्ठतेच्या निकषावर प्रभारी सचिव पदाचा पदभार विठ्ठल क्षीरसागर यांच्याकडे देण्यात आला होता. त्यानंतर बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर यांनी सदरची नेमणूक बेकायदेशीर असल्याबाबतची तक्रार केली होती.
त्यानंतर पणन संचालकांनी जिल्हा उपनिबंधकाच्या उपस्थितीत संचालकांची बैठक घेऊन प्रभारी सचिवपद नेमणुकीच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार मंगळवारी, २९ जून रोजी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या उपस्थितीत बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर यांचे अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता बैठक घेण्यात आली.
यावेळी बाजार समितीच्या प्रभारी सचिव पदासाठी राजेंद्र पाटणे यांची सूचना सभापती बंडगर यांनी केली तर अनुमोदन उपसभापती चिंतामणी जगताप यांनी दिले. हा ठराव मतदानासाठी ठेवला असता ठरावाच्या बाजूने दिग्विजय बागल, चिंतामणी जगताप, बंडगर, ढेरे, रोडगे, केकान, शिंदे, झाकणे यांनी, तर ठरावाच्या विरोधात जयवंतराव जगताप, सरडे, पाटील, रणसिंग, लबडे, गुगळे, दोशी, मोरे यांनी मतदान केले.
बाजार समितीच्या बैठकीत संचालक मंडळाचा ठराव होऊनही प्रभारी सचिव पदाचा घोळ कायम आहे. प्रभारी क्षीरसागर की पाटणे याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे.
----
दोन्ही बाजूला ८-८ मतदान झाल्यानंतर सभापतीच्या विशेष अधिकाराद्वारे एक मत घेऊन सत्ताधारी गटाने हा ठराव मंजूर केला. दरम्यान, हा ठराव मंजूर झाला असला तरी माझे या नेमणुकीचे अपील पणन संचालक यांच्याकडे दाखल असून, ते प्रलंबित आहे. जोपर्यंत त्याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत मी माझा पदभार देणार नाही.
- विठ्ठल क्षीरसागर, प्रभारी सचिव
-----
सध्याच्या स्थितीत सर्व नऊ कर्मचारी क्षीरसागर यांच्यासोबत कार्यरत असून, सदरचा ठराव हा बेकायदेशीर आहे. त्यामुळे क्षीरसागर यांच्याकडील अधिभार काढून घेता येणार नाही.
- जयवंतराव जगताप, माजी सभापती
----
मंगळवारच्या बैठकीचा वृत्तांत पणन संचालकाकडे जिल्हा उपनिबंधक देतील. त्यानंतर क्षीरसागरकडून पाटणे यांना पदभार द्यावाच लागेल.
- शिवाजी बंडगर, सभापती