सोलापूर - शहरातील बाजारपेठ, व्यवहार आजपासून पूर्णवेळ खुले होत आहेत. दोन महिने निर्बंधांखाली असलेल्या सोलापूरकरांना आता फिरण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे; परंतु त्यांनी वागण्यावर बंधने ठेेवणे आवश्यक आहे. दर आठवड्याला पॉझिटिव्हिटी रेटनुसार लॉकडाऊनचा निर्णय होणार आहे. पॉझिटिव्ही रेट वाढला तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
शहरात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाने कहर केला. मागच्या लाटेच्या तुलनेत यावर्षी शहराची आणि शहरातील नागरिकांची मोठी हानी झाली. अनेक जिवलग आपल्याला सोडून गेले. पैसा आहे, प्रतिष्ठा आहे; पण उपचारासाठी बेड मिळत नाही, अशी अनेकांवर वेळ आली. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी कडक निर्बंधांचे धोरण घेतले. मे महिन्याच्या अखेरीस शहरातील कोरोना नियंत्रणात आला. व्यापाऱ्यांनी दुकाने खुली करण्यासाठी आंदोलन केलेे. शुक्रवारी बाजारपेठ खुली झाल्यानंतर अनेक ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली. लोक फिजिकल डिस्टन्सचे पालन करीत नसल्याचेही दिसून आले ही गर्दी आपल्या जीवावर बेतू शकते, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे. महापालिकेने सोमवारपासून गर्दीच्या ठिकाणी कडक कारवाईचे धोरणही हाती घेतले आहे.
आजपासून कोविड पश्चात तपासणी
कोविडबाधित रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महापालिकेच्या सर्व १५ आरोग्य केंद्रांत व मदर तेरेसा पॉलिकिक्लिक येथे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तन्वंगी जोग, डॉ. गावडे यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली म्युकरमायकोसिस आजार व कोविडपश्चात उद्भवणाऱ्या इतर लक्षणांची तपासणी सोमवारपासून सुरू होत आहे. सकाळी १० ते १ या वेळेत या केंद्रांमध्ये जाऊन तपासणी करून घ्या, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांनी केले.
कोरोना गेलाय हे मनातही येऊ देऊ नका. कोरोना अजूनही आहे. बाजारपेठेत शुक्रवारी गर्दी दिसून आली. अशीच गर्दी वाढली आणि कोरोना वाढला तर दुकाने बंद करण्याची वेळ येईल. कोरोनाची लक्षणे दिसली तर आजारपण अंगावर काढू नका. जवळच्य आरोग्य केंद्रात जाऊन चाचणी करून घ्या. मनपाच्या कोविड सेंटरमध्ये चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. अडचणी असतील तर आम्हाला कळवा. मात्र, कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, हे लक्षात असू द्या.
- पी. शिवशंकर, आयुक्त, मनपा.
शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ४ टक्के
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्हीसीद्वारे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी संवाद साधला. शहराचा पॉझिटिव्हिटी दर ४ टक्के आहे. हा दर पाच टक्क्यांच्या वर जाऊ लागला तर निर्बंध येऊ शकतात. शहरातील दुकानांची वेळ कमी होऊ शकते.