करमाळा : ग्रामपंचायत निवडणूक जिंकून सदस्य अथवा सरपंच होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक जण सातवी पासच्या नव्या निर्णयाने नाराज झाले आहेतच. पण, कित्येकांची ऐनवेळी धावपळही उडालेली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक अंगठे बहाद्दर उमेदवार अर्ज दाखल करीत होते. निवडूनही येत होते. लिहिता वाचता येत नसले तरी सरपंच, सदस्य म्हणून मिरवत होते. अशिक्षित असूनही शिक्षितांवरही नेतेगिरी करीत होते. नव्या अटींमुळे या मंडळींची बोलती बंद झाली. ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवारासाठी सातवी पास असण्याची अट समोर आली. त्यामुळे या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. आगामी निवडणुकीत आपण सरपंच व्हायचे ही मनीषा बाळगून पाच वर्षांपासून तयारी करणाऱ्या अंगठेबहाद्दरांची नेतेगिरीची हवाच या नव्या नियमावलीने काढून टाकली आहे. अनेकांनी निवडणुकीची तयारी केलेली असताना ऐनवेळी त्यांना हा दणका बसला आहे. पण पॅनेल प्रमुखांनाही ऐनवेळी नवा उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे.
पहिल्या दोन दिवसांत अर्ज भरलेल्यांचे अर्ज वैध होणार नाहीत आणि अर्ज भरण्याच्या तयारीत असलेल्या अंगठेबहाद्दरांच्या हालचालींना एकदम ब्रेक लागला आहे.
---
एखादा व्यक्ती त्याच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकला नाही. तो वयोवृध्द आहे. पूर्वी ग्रामीण भागात शिक्षणाची सोय नव्हती. हा त्यांचा दोष असू शकत नाही. केवळ शिक्षणाची अट घालून त्याच्या हक्कावर गदा आणणे योग्य नाही.
- शिवाजी कोळेकर
धायखिंडी, करमाळा
--
शिक्षणाची अट योग्यच असून शासनाच्या योजनांची माहीती घेता येईल. दुस-यावर विसंबून राहता येणार नाही. गावचा विकास होणार आहे.
- राजेद्र मेरगळ
हिवरवाडी, करमाळा