रुपेश हेळवे
सोलापूर : नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्यानंतर महाविद्यालय सुरू होण्याच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची हजेरी पाहता सध्या महाविद्यालये सुरू करणे हे घाईचे ठरेल, तरीही प्रशासनाने महाविद्यालय सुरू करण्याच्या सूचना दिल्यास आम्ही त्याचे पालन करू, असे मत व्यक्त करीत महाविद्यालये व विद्यापीठाने राज्य शासनाकडे बोट केले आहे.
ज्या राज्यात शाळा सुरू झाल्या त्यातील काही राज्यात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी वाढल्याचे लक्षात येत असल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळेच खूप कमी प्रमाणात पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले आहे. ही संख्या लक्षात घेता महाविद्यालये सध्या सुरू न करता ऑलनाईन शिक्षण घेणे उत्तम असल्याचे मत काही प्राध्यापक व्यक्त करत आहेत. कॉलेज जरी बंद असले तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबलेले नाही. मोठ्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. यामुळे अडीच-तीन हजार विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे हे अवघड असणार आहे. यामुळे सध्या ज्युनिअर कॉलेजचा प्रयोग चांगला वाटला तर टप्प्याटप्प्याने महाविद्यालये सुरू करण्यास अडचण नाही, असे मत कीर्ती पांडे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्यकेंद्र शासन, राज्य शासन, विद्यापीठ अनुदान आयोग आणि विद्यापीठाने महाविद्यालये सुरू करण्यास सांगितले तर आम्ही यासाठी तयार आहेत. पण विद्यार्थ्यांची सुरक्षा ही खूप महत्त्वाची आहे, त्यांच्या सुरक्षिततेला आम्ही प्रथम प्राधान्य देऊ. यात पालकांचा निर्णयही खूप महत्त्वाचा आहे. - अंबादास देशमुख, अध्यक्ष, प्राचार्य संघटना
कोणत्याही सुचना मिळाल्या नाहीत...सध्या कोरोना स्थितीमुळे महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय राज्य शासन आणि शिक्षण मंत्री घेतील. त्यांच्या सूचना आल्यानंतर आम्ही त्यांच्या सूचनेनुसार पुढील कामे करू. अद्यापपर्यंत महाविद्यालये सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना आम्हाला मिळालेल्या नाहीत. - मृणालिनी फडणवीस कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
प्रशासनाने साेय करावीप्राध्यापक ऑनलाईन शिक्षण नाईलाजाने देत आहेत. ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन शिकविणे आम्हाला आणि विद्यार्थ्यांना सोयीस्कर आहे. प्रशासन आणि महाविद्यालयांनी आम्हाला हजर राहण्याच्या सूचना केल्या तर आम्ही तत्काळ हजर राहू. पण विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सुरक्षिततेची प्रशासनाने सोय करणे गरजेचे आहे.- भगवान अदटराव,कार्यकारिणी सदस्य, सुटा संघटना