करमाळा : उजनी जलाशयातून पाणी उचलून इंदापूर तालुक्यातील गावांना देण्याच्या शासन निर्णयाची येत्या २२ मे रोजी सकाळी करमाळा तालुक्यातील गावा-गावात होळी करण्याचा निर्णय उजनीधरणग्रस्त संघर्ष समितीच्या जेऊर येथील बैठकीत आला. या निर्णयाला स्पष्ट विरोध दर्शविण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव बंडगर व अजित विघ्ने यांनी ही माहिती दिली.
जेऊर येथे उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक कोरोनाची नियमावली पाळत पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आदिनाथचे माजी संचालक नवनाथ झोळ होते.
कोरोनामुळे रस्त्यावरची लढाई तूर्तास लढता येत नसली तरी लाॅकडाऊन संपताच मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. तथापि शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी निवेदन देणे, चर्चा करणे याबरोबरच स्पष्ट विरोध दर्शविण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रम करण्याचे ठरले. त्यात सर्वप्रथम २२ मे रोजी तालुक्यातील गावा-गावात इंदापूरला पाणी देण्याच्या प्रस्तावित योजनेला मंजुरी देणाऱ्या २२ एप्रिलच्या आदेशाची होळी सकाळी ९ वाजता कोरोनाचे नियम पाळून करण्याचे ठरले.
यावेळी चर्चेत पं. स. सभापती गहिनीनाथ ननवरे, सुनील तळेकर, प्रा. अर्जुन सरक, सुहास गलांडे, महेंद्र पाटील, गोरख गुळवे, ॲड. दीपक देशमुख, तात्या सरडे, विजय नवले, धुळा कोकरे, सागर खांडेकर, गंगाधर वाघमोडे, राजकुमार देशमुख आदी उपस्थित होते.
---
अशी असेल तीन टप्प्यात भूमिका
तालुक्यातील सर्वपक्षीय व सर्व गटाच्यावतीने तीन टप्प्यांत कार्यक्रम करताना पहिल्या टप्प्यात २२ मे रोजी तालुक्यातील गावा-गावात इंदापूरला पाणी देण्याच्या प्रस्तावित आदेशाची सकाळी नऊ वाजता होळी करणे, दुसऱ्या टप्प्यात ३१ मेपर्यंत ग्रामपंचायतीचे ठराव एकत्र गोळा करून तहसीलदारांमार्फत शासनाला सादर करणे, तिसऱ्या टप्प्यात करमाळा तहसील कार्यालयासमोर इशारा म्हणून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणे, असा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
---
फोटो १७ करमाळा
ओळी :
जेऊर, ता. करमाळा येथे उजनी जलाशयातून इंदापूरला पाणी देण्याच्या निर्णयाविरोधात आयोजित बैठकीत बोलताना शिवाजीराव बंडगर.