सोलापूर : एमपीएससीने नुकतेच नवीन परिपत्रक काढले आहे. त्यात पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी मैदानी चाचणीत ६० गुण प्राप्त करणारा उमेदवार मुलाखतीसाठी पात्र असणार आहे, तसेच हे मैदानी चाचणीचे गुण निकालात ग्राह्य धरले जाणार नाहीत. हा निर्णय म्हणजे, बौद्धिक गुणवत्तेला जास्त भर आणि शारीरिक दृष्टिकोनाला कमी महत्त्व दिले जात आहे, असा आरोप उमेदवारांकडून केला जात आहे. यामुळे मैदानी चाचणीला वेळ देणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होणार आहे, असे मतही व्यक्त करीत आहेत.
मैदानी परीक्षेमध्ये जास्त गुण मिळविण्यासाठी उमेदवार वर्षानुवर्षे घाम गाळत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा बराच वेळ शारीरिक चाचणीचा सराव करण्यात खर्च करीत आहेत; पण एमपीएससीच्या नवीन नियमानुसार मैदानी चाचणीसाठी क्वालिफाय गुणपुरतेच महत्त्वाचे मानले जाणार आहे आणि मैदानी गुण हे मुख्य निकालात न धरता फक्त मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचे गुण ग्राह्य धरले जाणार असून, त्यावर अंतिम निकाल यादी जाहीर केली जाणार आहे. हा निर्णय २०२० च्या भरती पासून लागू करावेत, असे सांगण्यात आले आहे.
यामुळे मैदानाचा कसून सराव करणाऱ्या उमेदवारांचा या निर्णयामुळे भ्रमनिरास झालेला आहे. या पदाची तयारी करणारे उमेदवार राहुल दिघे म्हणाले, पोलीस उपनिरीक्षक हे पद शारीरिक दृष्टीने सुदृढ असणारे पद आहे. आयोगाने त्याचीच किंमत शून्य केली आहे. कारण पोलीस उपनिरीक्षक हा १२ तासांपेक्षा जास्त काम करतो. उद्या आरोपींचा पिच्छा करणारा पोलीस सुदृढ नसला तर काय होईल? दरम्यान, पण या निर्णयाचा एसटीआय / एएसओ या राज्यसेवा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे.
उमेदवारांचे विरोधाचे कारण
पोलीस उपनिरीक्षक पदाची तयारी करत असताना ज्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेची तयारी कमी झालेली असते ते आपली कसर मैदानी चाचणीमधून भरून काढतात, तसेच पूर्वी १०० गुणांच्या मैदानी चाचणीचा फायदा ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना होत असे; परंतु नवीन नियमांचा फटका ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना बसणार आहे. त्यामुळे एमपीएससीने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, असे मत मैदानी प्रशिक्षक मिथुन पवार यांनी व्यक्त केले.
हा निर्णय घेतल्यामुळे पीएसआय या पदास योग्य शारीरिक क्षमता असणारे अधिकारी आयोगाला कसे मिळतील? निर्णय परीक्षा दोन महिन्यांवर असताना आताच का घेतला गेली ? मैदानी चाचणीचे गुण ग्राह्य न धरल्याने आता मुलांनी शारीरिक चाचणीसाठी जी २ ते ३ वर्षे मेहनत घेतली त्याचे काय? या प्रश्नांची उत्तरे आयोगाने द्यावीत.
मोहम्मद जागीरदार, उमेदवार
पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर मुख्य, मैदानी चाचणी आणि मुलाखत या तीन टप्प्यांत चुरस असते. या तीनपैकी एकही टप्पा क्वालिफाय न करता गुणवत्तेनुसारच मेरिट लावले पाहिजे. मुख्य परीक्षेत मेरिट प्राप्तीनंतर फिजिकल गुणवत्तेनुसारच हवे. त्यामुळे गुणवत्तेला न्याय मिळेल. गुणवत्ता ही लेखीसाठी महत्त्वाची आहे तशीच शारीरिक चाचणीसाठी महत्त्वाची आहे. मुख्य, मैदानी चाचणी आणि मुलाखत या तिन्ही परीक्षा गुणवत्तेच्या आधारेच असाव्यात जेणेकरून मेरिटला महत्त्व राहील.
-दीपंकर जगताप, उमेदवार
एमपीएससीने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यासाठी वर्षाचा कालावधी लागतो. २०१८ च्या पीएसआय अंतिम निकालात बहुतांश विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीत ८० च्या वर गुण होते, तर ६० गुणांच्या पात्रतेचा काय उपयोग, यामुळे मैदानी चाचणी १०० गुणांचीच असावी किंवा एसटीआय / एएसओप्रमाणे मुख्य परीक्षेनंतर अंतिम निकाल लावावेत.
अमित कोळी, उमेदवार