सांगली : एलबीटीप्रश्नी महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईला विरोध म्हणून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा निर्णय रविवारी घेतला. उद्या (सोमवारी) सांगली, मिरज आणि कुपवाड क्षेत्रातील व्यापार, उद्योग बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती एलबीटीविरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. एलबीटीप्रश्नी महापालिका व व्यापाऱ्यांमधील संघर्ष आता टोकाला गेला आहे. महापालिकेने कर न भरणाऱ्या २५ व्यापाऱ्यांवर फौजदारी दाखल केल्याने व्यापाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळेच एलबीटीविरोधी कृती समितीने उद्या (सोमवार)पासून महापालिकेविरोधात बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांविरोधातील फौजदारी तक्रारी मागे घेण्याबाबतची अधिसूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोपर्यंत काढणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. समितीने उपोषणाबाबतचे निवेदन सांगली शहर पोलीस, जिल्हा पोलीसप्रमुख तसेच महापालिका आयुक्तांना दिले आहे. या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी राज्यातील व्यापारी प्रतिनिधी सांगलीत येणार आहेत. टप्प्या-टप्प्याने साखळी पद्धतीने हे उपोषण करण्यात येणार आहे. निवेदनात म्हटले आहे की, उपमहापौर प्रशांत पाटील यांनी व्यापाऱ्यांवर केलेले आरोप निंदनीय आहेत. ही करप्रणाली लेखापद्धतीची असल्याने कर घेऊन खिशात ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रशांत पाटील हेसुद्धा प्रतिष्ठित व्यापारीच आहेत. तरीही ते व्यापाऱ्यांना विरोध करीत आहेत. आम्ही कधीच राजकीय हेतूने प्रेरित होऊन आंदोलने केलेली नाहीत. महापालिका कर्मचाऱ्यांच्या थकित पगाराबाबत आम्हालाही चिंता आहे. त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्र्यांकडे याबाबतचे गाऱ्हाणे मांडून महापालिकेला तातडीने मार्ग काढण्याची विनंती केली होती. सत्ताधारी गटाचे नेते मदन पाटील यांनी केलेली मदत आम्ही विसरलेलो नाही. आम्ही त्यांच्यावर कधीच आरोप केले नाहीत. उपमहापौरांनी अर्थाचा गैरअर्थ करून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीस समीर शहा, विराज कोकणे, धीरेन शहा, आप्पा कोरे, अनंत चिमड, मुकेश चावला, प्रसाद कागवाडे, गौरव शेडजी, सोनेश बाफना, सुरेश पटेल, सुदर्शन माने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महापालिका क्षेत्रात आज ‘व्यापार बंद’चा निर्णय
By admin | Published: December 14, 2014 11:39 PM