पंढरपूर तालुक्यात ७२ ग्रामपंचायतींसाठी जवळपास ३३०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये एकमेव जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली. तालुक्यातील बोटावर मोजण्याइतक्या गावांमध्ये दुहेरी लढती आहेत. बहुतांश ग्रामपंचायतींसाठी तिहेरी लढतीची शक्यता असून, त्यादृष्टीने गावागावांत उमेदवारांनी कंबर कसली आहे. अशा अपक्ष अर्ज भरलेल्या उमेदवारांचे अर्ज माघारी घेऊन त्याचा आपल्या पॅनेलला, गटाला कसा जास्तीत जास्त फायदा होईल, यासाठी आता गट, पॅनेलप्रमुख कामाला लागले आहेत.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख ५ जानेवारी आहे. तोपर्यंत पॅनेल सोडून अपक्ष अर्ज भरलेल्यांनी अर्ज माघारी घेऊन आपल्या गटाला, पॅनेलला पाठिंबा द्यावा, यासाठी गावागावांत बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यांची मनधरणी सुरू आहे. मात्र, तरीही काही गावांतील उमेदवारांनी हरलो तरी चालेल मात्र उमेदवारी अर्ज माघारी घ्यायचा नाही या पवित्र्यात असल्याने पॅनेलप्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे. शेवटच्या दिवसांपर्यंत यामधील किती उमेदवारी अर्ज माघारी घेतात याबाबत गावागावांत चर्चा झडू लागली आहे.
----