सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पदवी अभ्यासक्रमाचा शेवटच्या वर्षाचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. यामुळे तलाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. यामुळे एकतर विद्यापीठाने लवकर निकाल जाहीर करावा अन्यथा शासनाने तलाठी परीक्षा तीस दिवस पुढे ढकलाव्यात, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत केली.
कोविडपासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा लांबत गेल्या. परीक्षांचे नियोजन चुकत गेले. यंदाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा जून अखेर अन् जुलैच्या पहिल्या आठवड्यात संपल्या. त्यामुळे निकाल लावण्यास उशीर सुरू होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. त्यामुळे आमदार शिंदेंनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून विद्यार्थ्यांच्या अडचणीला वाचा फोडली. सध्या तलाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थी तलाठी परीक्षांची तयारी करत आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना सोलापूर विद्यापीठाकडून निकालाची प्रतीक्षा आहे. निकाल लवकर न लागल्यास युवकांना फटका बसू शकतो, त्यामुळे विद्यापीठाने लवकर निकाल जाहीर करावा, अशी मागणी शिंदेंनी केली आहे.