पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा साखर उताऱ्यात नेहमीच आघाडीवर असतो. यंदा सरासरी ११.८३ टक्के असला तरी सध्या १२.८४ टक्के असल्याने हंगाम संपेपर्यंत १३ टक्के होईल. सोलापूर जिल्ह्याचा एकूण सरासरी उतारा ९.२३ टक्के तर आजचा उतारा १०.६८ टक्के आहे. हंगाम संपत आला तरी एकूण साखर उतरण्याची टक्केवारी १० च्या आतच राहिली.
बी-हेवी मळीच्या निर्मितीकडे कल आसवनी (डिस्टिलरी) प्रकल्पांची संख्या वाढत आहे. त्यांना मळी (मोलॅसिस) पुरवठा करण्याकडे कारखान्यांचा कल आहे. मळीमध्ये १५ ते २० टक्के रसाचे प्रमाण राखून ही मळी आसवनी प्रकल्पांना इथेनॉल निर्मितीसाठी विकली जात आहे. त्याला चांगला दर मिळत आहे. सी-हेवी मळीपेक्षा प्रतिटन दोन हजार रुपये कारखान्यांना जादा मिळत असल्याने बी-हेवी मळी विकण्याकडे अधिक कल आहे. मळीसोबत साखर गेल्याने उताऱ्यात १ ते १.५० टक्क्यांची घट होत आहे. साखर उतारा घटनेचे प्रमाण
कोल्हापूर जिल्ह्यात कोएम-०२६५ जातीच्या उसाची लागवड होते, परंतु ऊस परिपक्व झाल्याशिवाय किमान १५ महिन्यानंतर कारखाने गाळपाला घेतात. त्यामुळे साखर उतारा वाढतो. सोलापूर जिल्ह्यात कोएम-०२६५ जातीचा ६० टक्के ऊस आहे. हंगाम सुरू झाल्यासांपासून हाच ऊस गाळपाला घेण्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी तो परिपक्व होण्यापूर्वी १० व्या महिन्यातच गाळपाला पाठवतात. त्यात साखरेचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळेही साखर उताऱ्यात घट होते.
गाळपासाठी कारखान्यात स्पर्धा
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची गाळप क्षमता अधिक आहे. गाळप क्षमतेच्या तुलनेत जिल्ह्यात ऊस लागवड कमी आहे. त्यामुळे कारखाने मिळेल तो ऊस गाळपाला नेण्यासाठी स्पर्धा करतात. सर्वाधिक कोएम -०२६५ जातीचा ऊस असल्याने तोच स्वीकारावा लागतो. या ऊसाचे वजन चांगले मिळते म्हणून शेतकरी तोच निवडतात, पण कारखान्यांना तो परवडत नाही. तोडणी कामगार, वाहतूकदार यांचीही पसंती याच जातीच्या ऊसाला असते. उताऱ्यात त्याचा फटका बसतो.
असा आहे जिल्हानिहाय साखर उतारा
जिल्हा आजचा उतारा एकूण साखर उतारा
कोल्हापूर १२.८४ ११.८४
सांगली ११.०८ ११.५६
सातारा १२.६० १०.८५
पुणे १०.९१ १०.२५
सोलापूर १०.६८ ९.२३