सुस्ते येथे दररोज नऊ ते दहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. मात्र, २१ एप्रिलपासून जनता कर्फ्यूमुळे दिवसाला दोन ते तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत होणारी घट लक्षात घेऊन कोरोना ग्राम समितीने २४ एप्रिल रोजी बैठक घेऊन आणखी दोन दिवसांचा जनता कर्फ्यू वाढविला आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास चांगली मदत होणार असल्याचे उपसरपंच तुषार चव्हाण यांनी सांगितले.
२५ मार्चपासून सुस्ते येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ७५ वर पोहोचली आहे. यापैकी ५० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत, तर इतर २५ रुग्ण पंढरपूर येथील काही खासगी रुग्णालयांत, ६५ एकर येथील कोविड सेंटर, तर नॉर्मल लक्षण असलेले ८ बाधित रुग्ण श्रीदत्त विद्यामंदिर प्रशालेत उपचार घेत आहेत.
यावेळी सरपंच कांताबाई रणदिवे, उपसरपंच तुषार चव्हाण, विष्णू गावडे, हणमंत चव्हाण, परमेश्वर कांबळे, जीवन रणदिवे, अंनता चव्हाण, ग्रामविकास विष्णू गवळी, मुख्याध्यापक सुभाष अधटराव आदी उपस्थित होते.
आजार अंगावर काढू नका : रणदिवे
गावातून मास्क न घालता फिरणाऱ्यास दंड, तर जनता कर्फ्यूच्या कालावधीत गावातून मोकाट फिरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कोरोना ग्राम समितीने दिली आहे. सुस्ते येथील श्री दत्त विद्या मंदिर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी कोविड सेंटरची सोय केली आहे. या कोविड सेंटरमुळे नागरिकांनी ताप, सर्दी, खोकला असल्यास पहिल्या टप्प्यात चेक केल्यास पूर्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गावातल्या गावात बरे होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी ताप, थंडी व सर्दी असल्यास अंगावर न काढता कोरोनाची टेस्ट करून वेळेत उपचार घ्यावेत, असे आवाहन सरपंच कांताबाई रणदिवे यांनी केले आहे.